कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. याचा फटका कल्याणतील कुंभरवाड्यातील मूर्तीव्यवसायाला देखील बसला आहे. ऐन कोरोनाकाळात आलेल्या गणेशोत्सवात आलेली तूट माघी गणेशउत्सवात भरून निघेल अशी अपेक्षा मुर्तीकारांना होती. मात्र यंदाही मूर्तींच्या विक्रीत 50 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे मूर्तीकार आर्थिक संकटात सापडले आहेत.


कोरोना काळात सण उत्सव धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नियमांमुळे सण उत्सव साजरे करण्यावर बंधने आल्याने बहुतांश लोकांनी थोडक्यात हे सण समारंभ आटोपते घेतले आहेत. याचा मोठा फटका गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांना बसला आहे. कल्याणच्या कुंभारवाड्यात गणेशोत्सव काळात भक्तांची मूर्ती खरेदी करण्यासाठी एकच गर्दी असते. कोरोनामुळे भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवात बुकिंग कमी होती. त्यामुळे मूर्तीकारांना मात्र मोठा आर्थिक फटका बसला तीच परिस्थिती नवरात्रउत्सवात देखील होती. आता अनलॉक झाल्याने माघी गणेशोत्सवात गणेश मूर्तीची बुकिंग वाढेल अशी मूर्तीकारांना अपेक्षा होती. मात्र त्यांची ही अपेक्षा फोल ठरली आहे.


एकीकडे कोरोनाचे नियम दुसरीकडे लॉकडाऊन काळात भेडसावणारी आर्थिक अडचण त्यामुळे उत्सवावर कोरोना सावट कायम आहे. लोकांकडे पैसा नसल्याने मोठ्या मुर्त्या घेण्याऐवजी छोट्या मूर्त्यांना गणेश भक्त पसंती दर्शवित आहेत. दरवर्षी 250 ते 300 माघी गणपतींची बुकिंग असते मात्र यंदा कोरोनामुळे हीच संख्या निम्म्यावर आल्याने गणेश मूर्त्यांच्या विक्रीमध्ये 50 टक्के घट झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितलं . त्यामुळे एकूणच कोरोना फटका कुंभरवाड्यातील मूर्तीकाराना बसला असून हा व्यवसाय संकटात सापडल्याच दिसून येतं आहे.


माघी गणेशोत्सव 2021च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणं...

  • मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत, आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत.

  • मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरता 4 फूट आणि घरगुती गणपती मूर्तीची 2 फूटांच्या मर्यादेत असावी.

  • या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू/ संगमरवर मूर्तींचं पूजन करावं.

  • मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं.

  • माघी सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्य्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरं आयोजित करावी. तसंच श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क इत्यादीद्वारे उपलब्ध करावी.

  • गणपती मंडपात निर्जंतुकीकरणाची आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी.

  •  मंडपात एकावेळी 10 पेक्षा जाता कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसंच एकावेळी फक्त 15 भाविकांना दर्शनासाठी प्रवेश द्यावा.

  • मूर्ती विसर्जनाच्या वेळी जास्तीत जास्त 5 कार्यकर्ते असावेत.


संबंधित बातम्या :



Ganesh Jayanti 2021 | लक्षपूर्वक वाचा! माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना