मुंबई : देशभरात मातृभाषेतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्था उभा करण्यात याव्यात असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या भाषणामध्ये केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राने तातडीने मराठीतून शिक्षण देणाऱ्या अशा दोन संस्था उभ्या करण्याबाबत शासन म्हणून पुढाकार घ्यावा, अशी विनंती करणारं पत्र भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मराठी भाषेतील योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यापूर्वी मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण संस्था उभ्या राहिल्यास भाषेचा आणि महाराष्ट्राचा सन्मानच होईल, असंही शेलार यांनी पत्रात म्हटले आहे.


मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि मातृभाषेचा सन्मान प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्याने केलेले हे आव्हान एकाअर्थी एक मोठी संधी आहे. त्यामुळे तातडीने या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत याबाबतही तातडीने केंद्र सरकारशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.


व्हीजेटीआय, आयआयटी या सारख्या नामांकित संस्थांशी समन्वय साधून संलग्न करून तसेच केईएम, जे. जे. यासारख्या वैद्यकीय संस्थांशी संलग्न करून या संस्था मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी उभ्या राहायला हव्यात. असे झाल्यास भविष्यात मराठीतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीच्या हातून मराठीची सेवा घडेल, असेही ते मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत.