मुंबई : शहरातील गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) आनंददायी आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी मुंबई पोलिस (Mumbai Police) सज्ज झाले आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबई शहरात वाहतूक (Mumbai Traffic) सुरळीत राहण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीसांनी चोख उपाययोजना केलेल्या आहेत. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई या महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणी मुंबई शहर वाहतूक पोलीसांचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेली आहेत. गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan 2022) दरम्यान वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी निरिक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत.


गणेशोत्सवावेळी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी 10,644 पोलीस तैनात


विसर्जनादरम्यान वाहने बंद पडून अथवा विसर्जनाच्या मार्गात अडथळा दूर करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी पोलीस विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून लहान व मोठ्या क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जन कालावधीमध्ये गणेश भक्तांना वैदयकीय सुविधा मिळण्यासाठी प्राथमिक उपचार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. आगामी गणेशोत्सवावेळी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी 10,644 पोलीस अधिकारी आणि अंमलदार, होमगार्ड, ट्राफिक वॉर्डन, नागरी संरक्षण दल, एन.एस.एस., आर. एस. पी. तैनात करण्यात आले आहेत. या कामात वाहतूक पोलिसांना मदत करण्याकरता वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटना उदा. वॉटर सेफ्टी पेट्रोल इत्यादी यांचा समावेश आहे. 


आगामी गणेशोत्सवाचे काळात  विसर्जनाच्या मार्गावर 1 सप्टेंबर, 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर, 6 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर  रोजी दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत खालील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.



  • 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत.

  • 54 रस्ते एक दिशा मार्ग करण्यात आलेले आहेत.

  • 57 रस्ते मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेले आहेत.

  • 114  ठिकाणी जो पार्किंग घोषित करण्यात आलेली आहे.


गणेशोत्सवादरम्यान वाहतूक व्यवस्था निर्बंधांचे तंतोतंत पालन करून गणेशोत्सव  शांततेने व आनंदाने पार पाडण्यासाठी वाहतूक पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.