मोफत उपचाराची ऑफर
49 वर्षीय मन्सूर अहमद यांनी हृदय प्रत्यार्पणासाठी भारताकडे विनवणी केली होती. त्यांची ही विनंती फोर्टिस ग्रुपने मान्य केली आहे. फोर्टिस ग्रुप हॉस्पिटल्सने मुंबई आणि चेन्नईत हार्ट ट्रान्सप्लांट अर्थात हृदय प्रत्यार्पण शस्त्रक्रिया मोफत करण्याची ऑफर दिली आहे.
मन्सूर अहमद यांच्यावर सध्या कराचीतील जिन्ना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान, मन्सूर अहमद यांनी आर्थिक मदतीची गरज आहे की नाही हे अजून स्पष्ट केलेलं नाही. त्यांनी मेडिकल व्हिजा मिळावा अशी विनंती भारत सरकारकडे केली आहे.
फोर्टिस रुग्णालयाचे विभागीय संचालक (मुंबई) डॉ. एस नारायणी यांच्या माहितीनुसार, “सराकरने मन्सूर अहमद यांना मेडिकल व्हिजा दिला, तर आम्ही त्यांची मुंबई आणि चेन्नईत हृदय प्रत्यार्पण शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करु. व्हिजा मिळाल्यानंतर अहमद हे प्रवासासाठी फिट आहेत की नाही, याची तपासणी करु”
आरोग्य मंत्र्यांचा हिरवा कंदील
दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनीही अहमद यांना उपचारासाठी हिरवा कंदील दिला आहे.
'मुंबई मिरर'शी बोलताना सावंत म्हणाले, “जेव्हा एखाद्याचा जीव वाचवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा सीमेवरील संघर्ष, वैर पाहात नाही. आम्ही अनेक परदेशी नागरिकांवर उपचार केले आहेत. जर मन्सूर अहमद यांनाही भारतात उपचार घ्यायचे असतील, तर मला त्यामध्ये काही अडचण वाटत नाही.”
हॉकीपट्टू अंथरुणाला खिळला
भारताविरुद्धचे अनेक हॉकी सामने हिसकावणारा पाकिस्तानचा दिग्गज माजी हॉकीपट्टू सध्या अंथरुणाला खिळला आहे. मन्सूर अहमद सध्या हृदयरोगाने त्रस्त आहे. त्यामुळे मन्सूर अहमद यांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे विनवणी केली आहे.
हॉकी विश्वचषक विजेत्या पाकिस्तानी संघात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मन्सूर अहमद यांना हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी भारतात यायचं आहे. त्यासाठी त्यांनी भारत सरकारकडून व्हिजा मिळावा अशी विनंती एका व्हिडीओद्वारे केली आहे.
संबंधित बातम्या
पाकिस्तानी खेळाडू अंथरुणाला खिळला, उपचारासाठी भारताला विनवणी!