Mumbai Police : मुंबई पोलिस आयुक्तांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या फोटोची फ्रेम 'वॉल ऑफ फ्रेम'मध्ये लावण्याची जुनी परंपरा आहे. मात्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा फोटो इथं लावण्यात आलेला नव्हता. तब्बल 15 महिन्यांनंतर मुंबई पोलिसांनी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा फोटो अखेर लावण्यात आला आहे.  काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, परमबीर सिंहचा कोणताही फोटो उपलब्ध नव्हता त्यामुळं फोटो लावण्यास उशीर झाला.  


त्यामुळे 15 महिन्यांच्या विचारानंतर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तीनही माजी पोलिस आयुक्तांच्या फोटो फ्रेम्स एकत्र लावून परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 


IPS संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवला. त्यानंतर काही मिनिटांनी मुंबईचे तीन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, हेमंत नागराळे आणि संजय पांडे यांच्या फोटो फ्रेम्स 'वॉल ऑफ फ्रेम' वर लागले.


29 फेब्रुवारी 2020 ते 17 मार्च 2021 या कालावधीत कार्यालयात कार्यरत असलेल्या सिंह यांना महाविकास आघाडी सरकारने 17 मार्च 2021 रोजी मुंबई पोलिस आयुक्तपदावरून काढून टाकल्याने ही परंपरा ठप्प झाली होती. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके पेरल्याप्रकरणी आणि त्यानंतर ठाणे रहिवासी मनसुख हिरण यांची हत्या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर त्यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सिंह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मासिक खंडणीचे 100 कोटींचे टार्गेट दिले असल्याचा आरोप केला होता, त्यामुळे देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती.


परमबीर सिंह ज्या परिस्थितीतून गेले ते पाहता 'वॉल ऑफ फ्रेम'वर त्यांचा फोटो लावण्याची घाई केली नाही. 'वॉल ऑफ फ्रेम' आधीच मुंबईच्या 42 माजी पोलिस आयुक्तांच्या फोटो फ्रेमने भरलेली आहे. अगदी जे एस बारुचा ज्यांची नियुक्ती 15 ऑगस्ट 1947 झाली होती यांच्यापासून ते संजय बर्वे यांच्यापर्यंतचे फोटो या भींतीवर आहेत.  मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर चढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पायऱ्यांच्या भिंतीवर माजी आयुक्तांचे (बर्वेपर्यंत) फोटो लावण्यात आले आहेत.