Brihanmumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेच्या निधी वाटपावरून महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक आक्रमक झाले आहेत. पायाभूत सुविधांच्या निधी वाटपामध्ये समानता नसल्याचा आरोप करत मुंबई महापालिकेच्या महाविकास आघाडीतील माजी नगरसेवकांनी आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली आहे. 


मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला आहे. यामध्ये पायाभूत सुविधांसाठी वॉर्डनिहाय निधीचे वाटप केले जात आहे. या निधी वाटपाचा अधिकार आयुक्तांना असताना आयुक्तांऐवजी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने हे निधी वाटप केले जाणार आहे. पालकमंत्र्यांकडून निधी वाटप केले जात असल्याने यामध्ये भेदभाव होत असल्याचा महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांचा आरोप आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने निधी वाटपा संदर्भातील निर्णय मागे घ्यावा, अशा मागणीचे पत्र महाविकास आघाडीतील माजी नगरसेवकांनी आयुक्तांना दिले आहे. दरम्यान, माजी नगरसेवकांच्या या मागणीच्या संदर्भात आपण विचार करून योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.  


विकास निधीमध्ये असमानता असेल तर एकनाथ शिंदे यांनी महापौर व्हावे मुख्यमंत्री म्हणून राहू नये, अशी टीका माजी नगरसेविका विशाखा राऊत यांनी केली आहे. "आम्ही आयुक्तांची दोन आठवड्यापूर्वीच भेट घेतली होती. निधी वाटपामध्ये जी तफावत आहे ती तफावत कशाला? निधीवाटप समान द्या. 227 नगरसेवकांना  681 कोटी दिले आहेत. नगरसेवक सध्या अस्तित्वात नाहीत. त्यामुळे तो निधी आमदारांना द्यावा. यामध्ये पालकमंत्र्यांचा कोणताही अधिकार नसतो. पालकमंत्र्यांनी पत्र द्यायचे आणि त्यानुसार विकास कामे होतील हे कोणत्या नियमांमध्ये लिहिलेले आहे? आयुक्त म्हणतात की, मी कसे विचारू त्यांना. प्रशासकांची नियुक्ती ही काही कालावधीसाठी असे. आयुक्त दबावाखालीखाली आहेत म्हणून ते निर्णय घेत नाहीत, असे विशाखा राऊत यांनी म्हटले आहे. 


विशाखा राऊत म्हणाल्या, "आयुक्त म्हणाले की गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मीटिंग चालू आहे ती झाल्यावर येतो. पण आयुक्त पळून गेले. आम्ही इथे फोटो काढायला आलेलो नाहीत. मग जिथे आमचे आमदार खासदार नाहीत त्या विभागातील लोकांना तुम्ही वंचित ठेवणार का? आणि जिथे भाजप व शिंदे गटाचे लोक आहेत त्यांना तुम्ही विकास कामांचा निधी देणार का? आम्ही लवकरच अजित पवार यांची देखील भेट घेणार आहोत आणि त्यांनी देखील विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी करणार आहोत. यावर निर्णय झाला नाही तर उद्या आम्ही पुन्हा इथे येणार आणि यापेक्षाही मोठे आंदोलन करणार."