मुंबई : रेमंड कंपनीचे भूतपूर्व सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचा प्रवास अचाट करणारा आहे. इतक्या मोठा कपड्याच्या ब्रँडचे प्रमुख असतानाही ते प्रवासी विमान चालवायचे. वयाच्या साठीत त्यांनी एअर रेसही जिंकत विमान उड्डाणात इतिहास रचला आहे. शेवटी मुलाच्या नावे सर्व प्रोपर्टी केल्यानंतर ते कसे एकाकी आले. पद्मविभूषण पुरस्कार भेटल्यानंतर शरद पवार यांचा कसा फोन आला, या सर्व आठवणींना उजाळा उद्योगपती विजयपत सिंघानिया यांनी दिला. ते आज 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.


उद्योगपती विजयपत सिंघानिया यांनी फ्लाईंग 1959 मध्ये सुरु केलं. मात्र, हे करण्याचं वेड त्यांना आधीपासूनचं असल्याचं त्यांनी सांगितलं. मी सांताक्रूझ विमानतळावर विमान लँड होताना पाहायचो. एकदा जेआरडी टाटा विमानातून उतरले. त्यावेळी सातआठजण त्यांची सुटकेस घेण्यासाठी गेले. त्यावेळी ते म्हणाले मी माझी बॅग उचलू शकतो. ते मला खूप भावलं होतं. जी गोष्ट आज मनात आहे, त्या गोष्टीत जीवओतून काम करायचं हेच माझ्या यशाचं सूत्र असल्याचे ते म्हणाले.


त्यावेळी थोडक्यात वाचलो..
पुण्यातील मिलिटरीच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या मागच्या बागेत विमान उतरवण्याचं आव्हान मला देण्यात आलं. मी ते लगेच स्वीकारलं. पण, प्रत्यक्ष विमान उतरवण्याची वेळ आली त्यावेळी समोरचं दृष्ट पाहून मी हादरलोचं. कारण, बागेच्या आसपास सर्व नाराळची झाडे होती. मी टेकऑफ घेताना काही फांद्या ह्या टर्बाईनला घासल्या. अजून एक फूट विमान खाली असतो तर मोठा अपघात झाला असता, असा अनुभव सिंघानिया यांनी सांगितला.


जेआरडी टाटा यांनाही उड्डाणाचं वेड..
सिंघानिया यांनी जेआरडी टाटा यांच्यासोबतचाही एक अनुभव सांगितला. मी जेआरडी टाटा यांना एक पत्र लिहलं होतं. दोनअडीच महिन्यानंतर त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला फक्त दहा मिनीट मिळतील असे त्यांच्या सेक्रेटरीने सांगितले होते. जेआरडींनी मला विचारलं आपण काय करणार आहात? मी म्हटलं मी साध्या विमानाने लंडनहून मुंबईला येणार आहे. त्यांना धक्काचं बसला. ज्या विमानेच पार्ट लाकडाने बनलेले असतात. त्या विमानाने इतका लांबचा प्रवास.. मला म्हणाले तुमची रोजच्या फ्लाईट्सची माहिती देत चला. इतका त्यांना यामध्ये रस होता. मला दोन तासांपेक्षाही जास्त वेळ त्यांनी दिला.


रेमंड कंपनीवरुन गृहकलह..
वयाच्या 42 व्या वर्षी माझ्याकडे रेमंड कंपनीची कमान आली होती. आमच्या कुटुंबात रेमंड कंपनी कोण चालवणार यावरुन खूप कलह झाला होता. कामगारांनी माझ्या नेतृत्वात काम करण्याची भूमिका घेतल्याने कंपनी माझ्या ताब्यात आली.


मुलांना हयातीत काही देऊ नका..
आई-वडिलांना माझा सल्ला आहे, की तुम्हाला जे मुलांना द्यायचं असेल ते द्या. मात्र, तुम्ही जीवंत असताना देऊ नका. ते इच्छापत्रात द्या. जेणेकरुन तुम्हाला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही. अमेरीकेचे माजी अध्यक्ष लिंकन यांना एक प्रश्न विचारण्यात आला की एखाद्या माणसाला कसं ओळखायचं? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की त्याला पॉवर द्या. माझ्या बाबतीत तेचं झालं. मी माझ्या मुलाला सर्व दिल्यानंतर मला ते अनुभवायला मिळालं.

अन् शरद पवार म्हणाले...
मला पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा शरद पवार यांचा फोन आला. मला म्हणाले विजयपथ तुम्हाला एक पुरस्कार देणार आहे. मी म्हटलं काय? म्हटले पद्मविभूषण. माझा विश्वासचं बसला नाही. मी म्हणालो कशाला मस्करी करता. तर ते म्हणाले नाही खरचं देणार आहोत. त्यांना आधीच माहिती झाले असावे. त्यानंतर राष्ट्रपती कार्यालयातर्फे आधीच मला सर्व माहिती देण्यात आली. कुठून चालत यायचं, कपडे कोणती घालायची, वैगेरे.. पण, तो अनुभव भारी होता.