मुंबई : संसदेच्या कँटिनमधील खाद्यपदार्थांच्या स्वस्त दराच्या मुद्द्यावरून वेळोवेळी वादविवाद आणि चर्चा झाल्या होत्या. बऱ्याच चर्चा आणि खलबते झाल्यानंतर गेल्यावर्षी तिथल्या खाद्यपदार्थांचे भाव वाढले. आता चर्चा होत आहे ती महाराष्ट्रातल्या दोन कॅन्टिनमधील खाद्यपदार्थाच्या दराची. ही कॅन्टिन आहेत मुख्यमंत्री यांचे वर्षा आणि उपमुख्यमंत्री यांचे देवगिरी या शासकीय निवासस्थानामधील. वर्षा आणि देवगिरी या शासकीय निवासस्थानात येणाऱ्या अतिथींसाठी खानपान सेवा पुरवठादाराची काल नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी झुणका भाकर एवढ्या किंमतीत चिकन बिर्याणी मिळणार आहे.
मुख्यमंत्री यांचे वर्षा आणि उपमुख्यमंत्री यांचे देवगिरी या शासकीय निवासस्थानात खानपान सेवा पुरविण्यासाठी मे.सेंट्रल कॅटरर्स, मुंबई यांना जानेवारी 2023 पर्यंत हे काम मिळाले. या कंत्राटदाराने सर्वात स्वस्त दराने हे पदार्थ देण्याच्या ठरवले आहे. गेल्या पाच महिन्यात खाद्य तेलाचे दर 400 ते 500 रूपयांनी वाढले असताना या कंत्राटदाराने अतिशय स्वस्त दरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना खाद्य सेवा देण्याचे मान्य केले आहे.
वर्षा आणि देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपहारगृह चालविण्यासाठी मे.सेंट्रल कॅटरर्स यांना वापरावयास देण्यात येणाऱ्या खोल्यांचे भाडे, वीज व पाणी यांचे भाडे मात्र कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विकास मुंबई हे भरणार आहे. यामधले दर वाचून धक्का बसेल अशी स्थिती आहे. या ठिकाणी चिकन बिर्याणी केवळ अकरा रुपये, दही मिसळ दहा रुपये, व्हेज सँडविच दहा रुपये, सुकामेवा दहा रुपये, मसाला डोसा 11 रूपये आणि साधा डोसा 10 रूपयांत देवू अशी हमी कंत्राटदाराने दिली आहे.
राज्यातील कोणत्याही हॉटेलपेक्षा हे दर कमी आहेत. बिगर तारांकित साध्या हॉटेलमध्ये यापेक्षा सहा ते सात पट अधिक दर तिकडे तेलापासून सर्व खाद्यांनाचे दर वाढत असताना इतके कमी दर कंत्राटदार कंपनीला कसे पडतात हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे हाती आलेल्या यादीतील एकूण 44 पदार्थांचे एकूण बिल हे केवळ 1100 रुपये होत असल्याचं दिसत आहे.