मुंबई : एबीपी माझाने दाखवलेल्या ऑक्सिटोसिनच्या अवैध विक्रीच्या बातमीनंतर अन्न व औषध प्रशासनाला जाग आली आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि कोणत्याही नोंदणी किंवा चौकशीशिवाय ऑक्सिटोसिन विकणाऱ्या मुंबईतील 17 मेडिकल स्टोअरवर एफडीएची धडक कारवाई करण्यात आली आहे.


मुंबईत सायन, परळ, अंधेरी, दहिसर, कांदिवली, घाटकोपर या भागांमध्ये एफडीएच्या मेडिकल स्टोअरवर धाडी टाकण्यात आल्या असून, अनेक ठिकाणी एफडीएने बोगस ग्राहक पाठवून, ऑक्सिटोसिनची अवैध विक्री पकडली. अनेक ठिकाणी ऑक्सिटोसिनचा अवैध साठा आढळला. तसेच, संबंधित मेडिकल स्टोअरचे सर्व रेकॉर्डस् चेक करण्यात आले.

संबंधित बातमी : ऑक्सिटोसीन... कुठे वेश्या व्यवसायासाठी, तर कुठे फळ-भाज्यांमध्ये वापर

एबीपी माझाने ज्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करुन प्रिस्क्रीप्शन, नोंदणीशिवाय नियमांना धाब्यावर बसवून ऑक्सिटोसिन विकले जाते, हे दाखवून दिले, त्या सायन हॉल्पिटल समोरील जय हिंद मेडिकल स्टोअरवरही कारवाई करण्यात आली.

अंतिम रिपोर्ट सादर झाल्यावर या मेडिकल स्टोअरवर दंडात्मक आणि कायदेशीर या पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईसोबतच ठाण्यातही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्रभरात एफडीएची ऑक्सिटोसिन विरोधात मोहिमेला सुरुवात झाली आहे.

काय आहे ऑक्सिटोसीन?

हे एक संप्रेरक आहे... प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्रावाला प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येतं. तसंच, स्तनपानासाठीही हे उपयुक्त आहे. याची 0.5 मीमी एवढीच मात्रा पुरेशी असते. हे इंजेक्शन प्रिस्क्रिप्शनशिवाय पुरवू नये, असा आदेश असूनही सर्रास विक्री होत आहे. या इंजेक्शनचा वापर केवळ डॉक्टरांकडूनच व्हावा, असंही त्यात म्हटलं आहे.

कसा होतोय ऑक्सिटोसीनचा दुरुपयोग?

अल्पवयीन मुलींचे लैंगिक अवयव वेगाने वाढवण्यासाठी सेक्स माफियांकडून गैरवापर केला जातो.

दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी गैरवापर होतोय, त्यामुळे कर्करोगाची भीती आहे.

भाजी, फळं वेगाने वाढण्यासाठी गैरवापर होते. त्यामुळेही कर्करोगाची भीती असल्याचं तज्ञ सांगतात. तज्ञांच्या मते, ऑक्सिटोसीनचा जास्त वापर धोकादायक आहे. यामुळे व्यसन नसलेल्या माणसालाही कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत आहे. कारण, ऑक्सिटोसीनचा मोठा वाटा फळं, भाज्या, दूध यामध्ये आहे.

औषधांच्या दुकानात या इंजेक्शनच्या होणाऱ्या विक्रीमुळे याचा दुरुपयोग होण्याची भीती ऑल फुड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनने व्यक्त केली आहे. याविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. यावर योग्य निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे. खरंतर पूर्वी हे इंजेक्शन फक्त डॉक्टर आणि रुग्णालयांमध्येच उपलब्ध असायचं. आता सरकारने धोरण बदलल्याने ते औषधांच्या दुकानांमध्येही उपलब्ध झालंय.

ऑक्सिटोसीनचा गैरवापर थांबावा आणि त्याची कमतरताही भासू नये यासाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. ऑक्सिटोसीन खुलेआम मिळत असलं तरी त्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने कागदावर दिसणारे बरेच नियम तयार केले आहेत.

नियम तयार केले असले तरी प्रशासनाच्या नाकाखाली प्रिस्क्रीप्शन आणि कोणत्याही चौकशी शिवाय ऑक्सिटोसीन अगदी सहजरित्या मिळतंय. तेही निव्वळ 17 रुपयांत... कसं ते या व्हिडीओमध्ये पाहा...


VIDEO : स्पेशल रिपोर्ट : शरीरावर उभार आणणाऱ्या ऑक्सिटॉक्सिनने कॅन्सरला आमंत्रण