शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे हाजी अराफत शेख भाजपात
एबीपी माझा वेब टीम | 02 Sep 2018 01:37 PM (IST)
हाजी अराफत यांनी काल रात्री उशिरा भाजपात प्रवेश केला. काही दिवसांपासून त्यांनी शिवसेनेतल्या अनेक नेत्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती
मुंबई : महामंडळांच्या नियुक्त्यांनंतर आता फोडाफोडीचं राजकारण सुरु झालंय का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण, भाजपने अल्पसंख्याक आयोगाचं अध्यक्षपद शिवसेना वाहतूक संघटनेच्या हाजी अराफत यांना देताच त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपत प्रवेश केलाय. हाजी अराफत यांनी काल रात्री उशिरा भाजपात प्रवेश केला. काही दिवसांपासून त्यांनी शिवसेनेतल्या अनेक नेत्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र आधीच नियुक्त्या वादात असताना याद्वारे फोडाफोडीचं राजकारण सुरु झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार नरेंद्र पाटील यांचीही भाजपने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर केलेली नियुक्ती चर्चेचा विषय ठरली आहे. सत्तापदाचं आमिष दाखवून भाजपकडून दुसऱ्या पक्षांचे नेते फोडले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला होता. शुक्रवारी महामंडळ नियुक्त्या जाहीर झाल्या होत्या. यामध्ये हाजी अराफत शेख यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदी, तर नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.