मुंबई : पीएमसी बँकेचा व्यवहार केंद्र सरकारच्या अखत्यारित येत नाही. पण आज संध्याकाळी मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशी याबाबत चर्चा करणार आहे. या घोटाळ्याचा अभ्यास करुन, आवश्यक ती पावलं उचलली जातील, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलं आहे. या मोठ्या घोटाळ्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण पहिल्यांचा समोर आल्या आहेत.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या भाजपा कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी त्यांना घेरत आमचे पैसे आम्हाला परत द्या, अशी मागणी केली. त्यानंतर भाजप कार्यालयातच सीतारमण यांनी खातेधारकांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खातेदारांच्या मदतीसाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं.

गरज पडल्यास कायद्यात तरतूद
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की, "पीएमसी ही मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक आहे. याची नोंदणी सहकार निबंधकाकडे असते. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचं रेग्युलेशन पाहते.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत त्याचा व्यवहार येत नाही. मात्र तरीही मी माझ्या सचिवांना ग्रामविकास खात्याशी चर्चा करुन, या विषयाची गंभीर दखल घ्यायला सांगितलं आहे. गरज पडल्यास कायद्यात तरतूद करुन असे गैव्यवहार थांबवता येतील का याबाबत पावलं उचलणार आहोत. तसंच पुढच्या संसदीय अधिवेशनात याबाबत काही कठोर तरतुदी करुन या गैरव्यवहारावर चाप बसवण्याचे काम केलं जाईल. आज संध्याकाळी मी आरबीआयच्या गव्हर्नरसोबत याबाबत चर्चा करणार आहे."

संबंधित बातम्या

पीएमसी बँक घोटाळा
पीएमसी म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार 24 सप्टेंबरपासून बंद करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने 35A अंतर्गत पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार पुढील सहा महिन्यासाठी बंद करण्याचे आदेश दिले. बँक डबघाईला आल्यामुळे पीएमसी बँकेचे पुढील व्यवहार सुरु ठेवण्यास आरबीआयने परवानगी नाकारली. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर पीएमसी बँकेच्या खातेदारांना आता तीन महिन्यातून एकदा फक्त एक हजारापर्यंतच्या ठेवी काढता येणार आहे. अचानक पीएमसी बँकेचे व्यवहार बंद झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.

पीएमसी बँक कशामुळे संकटात?
पुढील 6 महिन्यात याबाबत योग्य तो मार्ग काढणार असल्याचं पीएमसी बँक व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. शिवाय ग्राहकांनी याबाबत काळजी करु नये, असंही पीएमसी बँकने ठेवीदारांना सांगितलं. बँकेचा एनपीए वाढणे, बँकेची गुंतवणूक धोक्यात येणे, वाढती बुडीत कर्ज ही पीएमसी बँक संकटात येण्याची मुख्य कारणे असल्याचं बँकिंग तज्ज्ञांचं मत आहे. पीएमसी बँकेला याआधीही रिझर्व्ह बँकेने नोटीस पाठवल्या होत्या. मात्र तरीसुद्धा बँकेचा अकार्यक्षम कारभारामुळे ही वेळ बँकेवर आल्याचं बोललं जात आहे.