मुंबई : मुंबईत झोपडीला आग लागून सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. वडाळा पूर्व येथील गणेशनगर परिसरात ही घटना घडली आहे. घटनेतील जखमींवर सायन आणि केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आगीच्या घटनेत जागृती चिकटे, जयश्री खारगावकर या दोन महिलांसह स्वरा चिकटे, अंश खारगावकर, खुशी चिखले, दिप्ती खारगावकर ही लहान मुलं भाजल्यामुळे गंभीर जखमी आहेत.

ही बुधवारी दुपारी 2 ते 2.30च्या दरम्यान घडली आहे. यावेळी एक मांजर एका घरावरून दुसऱ्या घरावर उड्या मारत होते. मांजर उड्या मारत असताना त्याचा चुकून उच्च दाब वाहिनीला स्पर्श झाला. त्या तारेतून विजेचा प्रवाह जास्त असल्यामुळे मांजराला आग लागली आणि ते जळते मांजर झोपडीवर पडले. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की क्षणार्धात झोपडीने पेट घेतला आणि काही कळण्याच्या आत झोपडी भस्मसात झाली. .

दुर्दैवी बाब अशी की, तीनच दिवसांपूर्वी हे कुटुंब गावावरून मुंबईला आलं होतं. हे कुटुंबीय मूळचे रायगड जिल्ह्यातील दिघी या गावचे रहिवासी आहेत.


आग्रीपाड्यात चौथ्या मजल्यावर भीषण आग
मुंबईतील आग्रीपाडा येथे मध्यरात्री अडीच वाजता अल इब्राहिम या इमारतीमधील चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली होती. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी 10 गाड्यांसह घटनास्थळी पोहोचत सतर्कता दाखवत अवघ्या काही तासात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. तसेच पोलीस प्रशासनाने घटनेचं गांभीर्य ओळखून संपूर्ण इमारत रिकामी केली. अग्निशमन दलाच्या सूत्रांच्या माहितीनुसार ही आग एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागली होती.