नवी मुंबई : नवी मुंबईतील खाडी किनारी गेल्या काही दिवसापासून आलेल्या परदेशी फ्लेमिंगो पक्षामुळे गुलाबी चादर पाण्यावर तरंगताना दिसू लागली आहे. ऐरोली ते पनवेलपर्यंत पसरलेल्या या खाडीमधील फ्लोमिंगो पाहण्यासाठी पक्षीप्रेमी ही गर्दी करू लागले आहेत. या फ्लेमिंगोचा मे महिन्यापर्यंत खाडी किनारी मुक्काम राहणार आहे.


ठाणे-नवी मुंबई-पनवेल अशा विस्तीर्ण भागात पसरलेल्या खाडीकिनाऱ्यावरील वातावरण फ्लोमिंगो पक्षासाठी पोषक असल्याने थंडीत मोठ्या संख्येने फ्लेमिंगोंचे दर्शन होऊ लागले आहे. नवी मुंबई शहराच्या पश्चिमेला असलेल्या खाडीत फ्लेमिंगोची गुलाबी चादर पसरली असल्याने लहान-थोरांची पावले तिकडे वळू लागली आहेत. ऐरोलीमध्ये वनविभागाने सुरू केलेली फ्लेमिंगो सफारी रोज फूल होत आहे.


जगात 6 जातीचे फ्लेमिंगो असले तरी नवी मुंबईच्या खाडीमध्ये सध्या लेसर आणि ग्रेटर असे दोन जातीचे फ्लेमिंगो पाहायला मिळत आहेत. लेसर जातीचे फ्लेमिंगो गुजरात मधील कच्छ येथून येतात तर ग्रेटर जातीचे फ्लेमिॅगो परदेशातील सायबेरिया आणि कझाकिस्तानमधून हजारो किलो मीटर प्रवास करून नवी मुंबईतील खाडीकिनारी स्थलांतरीत होत असतात. परदेशात या काळात थंडीचा मोसम , बर्फ वृष्टी होत असल्याने त्यांची भारताला पसंती असते. नवी मुंबईच्या खाडीकिनारी 206 विविध जातीचे पक्षी वास्तव्यास असल्याने पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरू लागली आहे.


नवी मुंबईच्या खाडीकिनारी शेवाळ, लहान मासे, खेकडे, झिंगा आदी मुबलक खाद्य मिळत असल्याने फ्लेमिंगोची पसंती या भागात जास्त आहे. यासाठीच वनविभागाने ठाणे, नवी मुंबई खाडी किनाऱ्याला फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य घोषित केले आहे. लॉकडाऊनमुळे कंटाळलेले मुंबईकर सद्या खाडीकिनारी पसरलेली फ्लेमिंगोची गुलाबी चादर पाहण्यात मग्न झाले आहेत. लहान मुलांना, विद्यार्थ्यांना पक्षांबाबत प्रेम निर्माण व्हावे, त्यांचे निरीक्षण करता यावे यासाठी वनविभागाने आयोजित केलेल्या फ्लेमिंगो सफारीमध्ये मोठ्या संख्येने भाग घेवू लागले आहेत.


फ्लेमिंगोचे वैशिष्ट्य


लेसर फ्लेमिंगो
आकाराने लहान, चोच गडद तपकिरी रंगाची, मान एस आकारासारखी, उंची 2 ते 2.5 फूट असते


ग्रेटर फ्लेमिंगो
आकाराने मोठा, चोच पांढऱ्या रंगाची, मान जे आकारासारखी, उंची 3.5 ते 4 फूट असते.