MSRTC News: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आपल्या जीवाभावाच्या लालपरीनं अर्थात एसटीने बासष्ठी पार केली आहे. मध्यंतरी संप आणि कोरोना काळात एसटीचं कंबरडं मोडलं. हजारो कर्मचारी संपावर गेले. कोरोनात सगळं बंद असल्याचा मोठा फटका एसटीला बसला. यातून आता सावरायचा प्रयत्न एसटी महामंडळ करत आहे. सरकार देखील यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. 


यातच एक पुढचं पाऊल म्हणून आता  राज्य परिवहन मंडळासाठी 5150 इलेक्ट्रिकल बसेस येणार आहेत. त्याचबरोबर 5000 डिझेल बसेसचे सीएनजीवर रुपांतर केलं जाणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक यासाठी राज्याला सहकार्य करणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे शिष्टमंडळ सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी भेटून चर्चा केली. 


एडीबी बँकेच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितलं की, राज्यात नदी जोड प्रकल्प, वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठीचा प्रकल्प तसेच राज्य परिवहन मंडळासाठी 5150 इलेक्ट्रीकल बसेस, त्याचबरोबर 5000 डिजेल बसेसचे सीएनजीवर रुपांतर करणे या प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळातील सदस्यांनी राज्यात दौरे करून विविध प्रकल्पांच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधल्याचे यावेळी सांगितले.  


सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समुह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नविन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.  
 
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय घेऊन राज्य शासन वेगवान निर्णय घेत आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आमचे प्रयत्न असून पायाभूत प्रकल्पांना एशियन डेव्हपलमेंट बँकेने आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


ठाणे मेट्रो,रिंगरोड, पुणे आणि नाशिक मेट्रोसाठी मदत करावी


नवीन महाबळेश्वर प्रकल्प पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करतानाच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरणार असून बँकेने समुह विकास प्रकल्पांना आर्थक मदत करावी. जेणे करून महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करणे शक्य होईल. एडीबी बँकेने मुंबईतील मेट्रोच्या काही प्रकल्पांना सहाय्य केले असून आता त्यांनी ठाणे मेट्रो, ठाणे रिंगरोड, पुणे आणि नाशिक मेट्रोसाठी देखील मदत करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.