मुंबई : हिमाचल प्रदेशातील मनाली इथल्या अटल बिहारी वाजपेयी माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट इथे आयोजित पंचवीस दिवसीय गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी मुंबईतील पाच पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
अटल बिहारी वाजपेयी माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित पंचवीस दिवसीय गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी राज्यभरातून 44 जणांची निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये मुंबईतील पाच पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता.
या गिर्यारोहण प्रशिक्षणाचा फायदा संकटकालीन परिस्थितीमध्ये नागरिकांच्या बचावासाठी होणार असून अतिशय कठीण परिस्थितीमध्ये याचं प्रशिक्षण दिलं जातं. 3 एप्रिल ते 28 एप्रिल पर्यंत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे.
मुंबई पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अमोल साळुंखे काळाचौकी पोलीस स्टेशन, प्रदीप तुपे क्यूआरटी, द्वारका पोटवडे डोंगरी पोलीस स्टेशन, उषा मस्कर वी पी रोड पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा पाटील विशेष शाखा 1 या सर्व अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे जे पुढील 25 दिवस यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
या प्रशिक्षणामध्ये झुंबा, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, नैसर्गिक रॉक क्लायबिंगचा समावेश आहे. याशिवाय भूकंप, भूस्खलन, आग लागणे, इमारत कोसळणे या दुर्घटनेतून नागरिकांचा बचाव करुन त्यांचा जीव वाचवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
या शिबिराचा फायदा नागरिकांना निश्चितच होणार असून येणाऱ्या दिवसांमध्ये या सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांची ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आलेल्या संकटाशी लढण्यास पोलीस विभाग आणखी सज्ज होईल.