मुंबई : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)  यांच्या संकल्पनेतून मुंबईतील गिरगावात पहिला वहिला क्यूआर कोड चौक (QR Code)  तयार करण्यात आला आहे.  पहिल्या क्यूआर कोड चौकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबई शहरातील गावदेवी परिसरात असलेल्या ह्यूस मार्गावर गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा चौक उभारण्यात आला आहे. या उद्घाटन कार्यक्रमात सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके गीतरामायणाचा कार्यक्रम सादर केला.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पाच दशकांपेक्षा जास्त काळ ज्यांनी आपल्या आवाजाने आपल्या मनावर अधिराज्य केलं असे सुधीर फडके यांच्या नावाने स्वरसम्राट श्री सुधीर फडके चौकाचे उद्घाटन झालं. नम्रता आणि कणखरपणा हे त्यांचे वेगळेपण होते . हे याआधी व्हायला हवं होतं पण आन होतंय ही आनंदाची बाब आहे. मंगल प्रभात लोढा मंत्री झाले तेव्हापासून त्यांनी मुंबई आणि मराठी माणसाचे जतन कसे करता येईल यासाठी काम केलं आजचा कार्यक्रम त्याचे उदाहरण आहे. प्रखर राष्ट्रवाद बाबूजीमध्ये होता. मुक्ती संग्रामात त्यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. मोठे आंदोलन उभारण्यात त्यांची मोलाची भूमिका होती.


क्यूआर कोड चौकाचे वेगळेपण काय?



  • कलारत्नांचे, महापुरुषांचे, थोर संतांचे, विचारवंतांचे अनेक चौक आणि पुतळे उभारले जातात, पण शहरात येणाऱ्या पर्यटकांना अथवा स्थानिकांना त्यांच्याबाबत योग्य माहिती त्वरित मिळत नाही. 

  • बघताक्षणी हा पुतळा कोणाचा? अथवा या चौकाला ज्यांचे नाव दिलंय ते कोण? असे साधे प्रश्न विचारले जातात आणि अनेकदा अनुत्तरित राहतात. 

  • क्यूआर कोड या नव्या संकल्पनेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम केले आहे. 

  • येथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा स्थानिकांना एका शिलेमध्ये कोरलेला क्यूआर कोड स्कॅन करून सुधीर फडके यांच्या जीवनकार्याची माहिती काही क्षणात उपलब्ध होणार आहे.



 खरे नायक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न सातत्याने चालला आहे हे बाबूजींना लक्षात आले. त्यांनी स्वतःचे सर्वस्व पणाला लावत सावरकर यांची प्रत्येक गोष्ट समोर यावी यासाठी चित्रपट केला.  यासाठी बाबूजींना खूप कष्ट करावे लागले. बाबूजी मंतरलेल्या पिढीचे सर्वस्व होते. गीत रामायणाने बाबूजी अजरामर झाले. गीत रामायणाची रचना बाबूजींनी केली. गीत रामायण कधीही ऐकलं तरी त्याचा गोडवा तसाच आहे. कुठलंही तंत्रज्ञान नसताना त्यांनी रामायण उभं केलं. आजही आपल्या समोर चित्र उभे करतात. अशी व्यक्तिमत्व असतात त्यांना आपल्या मनात जपायचं असते. बाबुजींनी  तयार केलेलं वैभव आहे ते पुढच्या पिढीला पोहोचले पाहिजे म्हणून आपण असे चौक तयार केले आहेत,  असे फडणवीस म्हणाले.