मुंबई : मुंबईतील कमला मिल आगीची घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा एकदा आगीने चार जणांचा बळी घेतला आहे. अंधेरीमधील मरोळ परिसरात असणाऱ्या मैमून इमारतीला रात्री दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आगीतून सात जणांची सुटका करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दोन वाजेच्या सुमारास या इमारतीत राहणाऱ्या कपासी कुटुंबाच्या रुम नंबर 603ला भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, या कुटुंबाला घराबाहेर पडताच आलं नाही. तेव्हा त्यांनी खिडकीमधून लोकांकडे मदत मागितली. पण कोणालाही त्यांना मदत करणं शक्य नव्हतं. त्यामुळे घरातच त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

आग लागली त्या घरात एकूण चार जण होते तर त्याच्या वरच्या मजल्यावर सात जण होते. या सातही जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. यामध्ये काही जण जखमी झाले असून त्या सर्वांना कूपर आणि मुकुंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

अग्नितांडवातील मृतांची नावे :

1. दाऊद अली कपासी (वय 80 वर्ष)

2. मोहीन अपासी कपासी ( वय 10 वर्ष)

3. तस्लीम अपासी कपासी (वय 42 वर्ष)

4. सकीना अपासी कपासी (वय 14 वर्ष)

संबंधित बातम्या :

मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू