मुंबई : सकाळी 8 वाजेच्या सुमारास बंद झालेली मुंबई दिवसभराच्या खोळंब्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून पूर्वपदावर येऊ लागली. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करताच मुंबईचे रस्ते, लोकल आणि मेट्रो हे तिन्ही मार्ग सुरु झाले. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला.


दरम्यान, मुंबईत झालेल्या हिंसेच्या घटनांप्रकरणी आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया मुंबई पोलिस सुरु करणार आहेत.

दिवसभर रेल्वे सेवा ठप्प

आंबेडकरी आंदोलकांनी मुंबईकरांच्या लाईफलाईनला अडवल्याने प्रवाशांची गोची झाली. सर्वात आधी पश्चिम रेल्वेवर वसई आणि नालासोपाऱ्यात आंदोलकांनी लोकल अडवल्या आणि त्यानंतर हे लोण इतरत्र पसरलं. आंदोलन सुरु होण्याच्या तासाभरातच मुंबईच्या तिन्ही मार्गावर लोकल बंद करण्यात आल्या.

विशेषतः ठाणे, घाटकोपर, विक्रोळी या मध्य रेल्वेवरच्या स्थानकांवर लोकल जागच्या जागी थांबवण्यात आल्या. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांनी लोकल सोडून रुळांवरून चालत ऑफिस गाठलं. तर काही प्रवासी माघारी परतले. विक्रोळीमध्ये एका लोकलवर दगडफेकीची घटना घडल्याची माहितीही समोर आली आहे.

हार्बर लोकल मार्गावर जुईनगरमध्ये आंदोलकांनी लोकल अडवल्या. पण नंतर तासाभराने आंदोलकांना हटवून वाहतूक सुरु करण्यात आली.

रस्ते वाहतूक पूर्ववत

मुंबईमध्ये बंदचा मोठा फटका बसला तो रस्ते वाहतुकीला... आंबेडकरी संघटनांच्या आंदोलकांनी मुंबईचे महत्त्वाचे महामार्ग पूर्णपणे बंद करुन टाकले होते. पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सायन पनवेल महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावर आज वाहनधारकांची सर्वाधिक कोंडी झाली.

प्रत्येक उपनगराच्या नाक्यावर आंबेडकरी आंदोलकांनी नाकाबंदी केली होती. त्यामुळे बरेच प्रवासी रस्त्यातच अडकून होते. विशेषत: घाटकोपर, विक्रोळी, पवई आणि चेंबूर या भागांमध्ये वाहतूक कोडी झाली होती. बंद मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत झाली आहे.

मेट्रो सेवा सुरु

आजपर्यंत आंदोलनामुळे कधीही ठप्प न झालेली मेट्रोही आज बंद करावी लागली. सकाळी आंबेडकरी संघटनांनी घाटकोपरच्या मेट्रो स्थानकावर रुळावर उड्या घेत मेट्रो बंद पाडली. त्यामुळे कसेबसे घाटकोपरपर्यंत पोहोचलेल्या प्रवाशांना पश्चिम उपनगरात पोहोचण्याचा मार्गही बंद झाला.

त्यामुळे अनेक लोकांनी पायी जाण्याचा पर्याय घेतला. दरम्यान मेट्रोची वाहतूक काही काळाने वर्सोवा ते विमानतळ रस्ता स्थानकापर्यंत सुरु करण्यात आली. पण संध्याकाळी 5 वाजता वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो वाहतूक पूर्ववत झाली.

मुंबईसह सर्व मोठ्या शहरांमध्ये बंदचा परिणाम

महाराष्ट्र बंदमुळे मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महानगरांमध्ये आज शुकशुकाट बघायला मिळाला. मुंबईसह परिसरातील उपनगरं अक्षरश: ठप्प होती. पुण्यातही काहीशी मुंबईसारखी परिस्थिती बघायला मिळाली. अनेक ठिकाणी आंदोलकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली.

बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरात अनेक ठिकणी बंद पाळण्यात आला. तर उपराजधानी नागपुरातही या बंदचा परिणाम जाणवला. बाजारपेठा, सरकारी आणि खाजगी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होती.