मुंबई : भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये आग (Mumbai BJP Office Fire ) लागल्याची घटना घडलीय. भाजपच्या नरिमन पॉईंटच्या कार्यालयात ही आग लागली असून किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असून या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. या कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रं आणि प्रचाराचं साहित्य असल्याने ते आगीमध्ये जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रविवारचा दिवस असल्याने मुंबईच्या कार्यालयात वेल्डिंगचं काम सुरू होतं. त्यावेळी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. भाजप कार्यालयाच्या मागच्या बाजूने ही आग लागली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट पाहायला मिळाले. या कार्यालयामध्ये कुणीही व्यक्ती अडकला नसल्याची माहिती आहे.
अग्निशमन दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी
नरिमन पॉईंटवरील भाजपचे कार्यालय हे प्रमुख कार्यालय असून त्या ठिकाणी पक्षाशी संबंधित मोठ्या प्रमाणावर कागदपत्रं आणि इतर प्रचार साहित्य असल्याची माहिती आहे. त्याचं किती नुकसान झालं आहे हे अद्याप समोर आलं नाही.
या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर मंत्रालयाचा परिसर आहे. तर या कार्यालयाच्या शेजारी मोठा हॉल आहे. अग्निशमन दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मुंबईतील हे प्रमुख कार्यालया असून या ठिकाणी राज्यभरातून अनेक मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कायम गर्दी असते. पण आज रविवार असल्याने या ठिकाणी कुणीही नव्हतं अशी माहिती आहे.
नुकसानाची माहिती घेणार, प्रवीण दरेकरांची माहिती
मुंबई कार्यालयाला आग लागल्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी एबीपी माझाशी संवाद साधत त्याची माहिती दिली. ते म्हणाले की, या आगीची माहिती मिळताच काही प्रमुख नेते त्या ठिकाणी पोहोचत आहेत. या कार्यालयात निवडणुकीच्या संबंधित काही कागदपत्र आणि साहित्य होतं. त्याचं नुकसान झालं का याची माहिती घेतली जात आहे. तसेच या आगीचे नेमके कारण काय तेही तपासलं जाणार आहे. निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने त्याची गंभीर दखल घेतली जाईल. या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशनम दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून काही प्रमाणात आग ही नियंत्रणात आली आहे.
ही बातमी वाचा: