मुंबई : लालबाग गणेश मंडळातील कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑन ड्युटी पोलिस निरीक्षकाशी गैरवर्तन केल्याने कार्यकर्त्यावर मुंबईच्या काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.


 

कार्यकर्त्याने ऑन ड्युटी असलेल्या पोलिस निरीक्षकाला मंडपात जाण्यास रोखलं आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं. त्यानंतर पोलिस निरीक्षकाच्या तक्रारीनंतर कलम 353 आणि 332 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हा कार्यकर्ता मंडळाच्या परिसरातील इमारतीत राहतो. या इमारतींमधील रहिवाशांना मंडळातर्फे दर्शनासाठी पास दिले जातात. इतकंच नाही तर त्यांच्या गाड्यांनाही पास असतात.

 

नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशोत्सावानिमित्त प्रचंड गर्दी वाढली आहे. सामान्य नागरिकांपासून नेत्यांपासून, सेलिब्रिटींपासून खेळाडूं सगळेच इथे दर्शनाला येतात, परिणामी इथे पोलिसांचा मोठा फौजफाटा असतो. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रात्रं-दिवस पोलिस सुरक्षेसाठी तैनात असतात.