मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणेश दर्शनासाठी हजेरी लावली. गणेशा आरतीनंतर मुख्यमंत्री आणि मलिंद नार्वेकर यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली.



काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी 'मातोश्री'वर हजेरी लावून उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजन केलं होतं. त्यानंतर आता थेट त्यांच्या सचिवाच्या घरी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीआधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना- भाजप युतीतील धुसफूस दूर करून, 'मातोश्री'शी संबंध अधिक बळकट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.



गेल्या आठवड्यात मध्य वैतरणा धरणाचा नामकरण सोहळा आणि गृहनिर्माण धोरणाची घोषणा अशा दोन जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले. पक्षातली अंतर्गत नाराजी आणि राज्यातील 10 महापालिका निवडणुकांची जबाबदारी पाहता, मुख्यमंत्री शिवसेनेशी सूर जुळवून घेत असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.