कल्याण : बदनामी करण्याची धमकी देत बिल्डरकडे ५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी भाजप नगरसेविकेच्या पतीसह मनसेच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरच्या म्हारळ परिसरात रिजन्सी अँटिलिया नावाचा गृहनिर्माण प्रकल्प उभा राहतो आहे. या प्रकल्पात अनियमितता असून त्याची बदनामी करण्याची धमकी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम आणि भाजप नगरसेविकेचा पती ज्ञानेश्वर पाटील यांनी दिल्याचा आरोप रिजन्सी ग्रुपचे संचालक अनिल भटिजा यांनी केला आहे.
पाटील आणि कदम यांनी साईटवर येऊन ऑफिसमधल्या लोकांना दमदाटी केल्याचा आरोप अनिल भटिजा यांनी केला आहे. याप्रकरणी भटिजा यांच्या तक्रारीवरुन कल्याण तालुका पोलिसांनी सचिन कदम आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तर रिजन्सी बिल्डरने सरकारी जमीन हडपली असून हा प्रकार उघड केल्याने आपल्याला यात गोवल्याचा आरोप सचिन कदम यांनी केला आहे.
दरम्यान, १६ मे रोजी गुन्हा दाखल होऊनही अद्याप दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही.