मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी उल्हासनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत भाजपवर तुफान टीका केली. राममंदिर, कर्नाटकातली सत्तास्थापना, राज्यपालांची भूमिका यावरुन त्यांनी भाजपला लक्ष्य केलं.


कर्नाटकात लोकशाहीचा गळा घोटला

कर्नाटक म्हणजे ‘कर नाटक’ आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाला सत्तास्थापन करण्याची संधी राज्यपालांनी द्यायला हवी, मात्र कर्नाटकात जे झालं, तो लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

जनसंघापासूनचा कार्यकर्ता असलेल्या कर्नाटकच्या राज्यपालांवर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शिवाय असं होणार असेल तर निवडणुका घेण्याऐवजी थेट दिल्लीतून मुख्यमंत्री जाहीर करावा, म्हणजे मोदींना परदेश दौरे थांबवावे लागणार नाहीत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही उद्धव यांनी टीका केली. 

राममंदिराची घोषणा एव्हरग्रीन

राममंदिराची घोषणा ही भाजपची एव्हरग्रीन घोषणा असून निवडणुका आल्यावरच हिंदुत्त्व आठवतं, नंतर मेहबुबा मुफ्ती वगैरे कुणीही चालतं, असं म्हणत उद्धव यांनी भाजपला लक्ष्य केलं.

विकास आराखडा फाडून टाका

उल्हासनगरच्या विकास आराखड्याला आपला विरोध असून, हा विकास आराखडा फाडून चुलीत टाकण्याचे आदेश त्यांनी यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे उल्हासनगरमध्ये आले होते.