मुंबई : राज्यातील पूरस्थितीमुळे मोडकळीस आलेल्या, पडलेल्या शाळांची उभारणी, दुरुस्ती करण्यासाठी तसेच इतर महत्त्वाचे शैक्षणिक प्रकल्प राबवण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री आणि बालभारती नियामक मंडळाची शुक्रवारी मुंबईत बैठक पार पडली. यावेळी काही महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. यामध्ये पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे.
आत्तापर्यत पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 9 प्रकारांमध्ये 20 रुपये इतकी अत्यल्प शिष्यवृत्ती मिळत होती. म्हणजेच वार्षिक किमान 240 रुपये आणि दोन प्रकारांमध्ये 100 रुपये प्रति महिना असं या शिष्यवृत्तीचे स्वरूप होतं. मात्र आता या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्व 11 प्रकारच्या शिष्यवृत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली असून शिष्यवृती रकमेव्यतिरीक्त प्रति विद्यार्थी वार्षिक रक्कम 750 रुपये बालभारतीमार्फत देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 32 हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
यासोबतच राज्यातील पूरपरिस्थिती, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 2177 शाळांसाठी, मोडकळीस आलेल्या तसेच पडलेल्या शाळा यांची उभारणी, दुरूस्ती करण्यासाठी 57 कोटी रुपये निधी मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता प्रचलित अभ्यासक्रमावर आधारीत विविध विषयांचे अध्ययन सहज आणि सोपे व्हावे यासाठी ऑडिओ बूक बालभारतीच्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान 2 शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण घेता यावे, यासाठी व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून उत्तमोत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच नामवंत लेखक ,कवी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार यांचे तसेच इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता यावे यासाठी राज्यातील सुमारे 725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम प्रकल्प राबविण्यासाठी 50 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी या बैठकीत देण्यात आली.
मुंबईत अद्ययावत ग्रंथालयास मंजुरी देण्याचा निर्णय
मराठी भाषा विकसनासाठी, नवीन संकल्पना , शब्द , विचारप्रवाह यांचा चिकित्सक अभ्यास होऊन मराठी भाषेमध्ये नाविन्यपूर्णतेची भर पडावी, त्यामध्ये मराठी भाषेचे लेखन, वाचन करणाऱ्यांना संधी मिळावी व मराठी भाषेच्या समृद्धीसाठी स्वतंत्र केंद्र असावे यासाठी ग्रंथाली वाचक चळवळीच्या माध्यमातून मुंबई येथे अद्ययावत ग्रंथालय सुरू करण्यासाठी रुपये 5 कोटी इतका निधी ग्रंथाली विश्वस्त संस्था यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहे.