मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी  विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यात वरळीत आदित्य ठाकरेंचे बॅनर्स लागल्याने ही चर्चा अधिकच जोर धरु लागली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतूच लढणार असल्याची घोषणा गट प्रमुखांच्या मेळाव्यात केल्याचं समोर आलं होतं.


हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडविण्याची या मथळ्याखाली वरळीत आदित्य ठाकरेंचे बॅनर्स झळकले आहेत. आदित्य ठाकरे हे गेल्या अनेक दिवसांपासून वरळी विधानसभा क्षेत्रात फिरत आहेत, लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या सूचना आणि इतर नेत्यांची वक्तव्य पाहिली तर आदित्य याठिकाणी निवडणूक लढू शकतात हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.


राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले वरळी विधानसभेतील माजी आमदार सचिन आहिर आणि विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनीही आदित्य ठाकरेंचं स्वागत केलं आहे. आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढते तर आमचा पाठिंबा असेल, असं दोघांनीही म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांना वरळीतून एक लाख मतांपेक्षा जास्त मताधिक्याने जिंकून आणण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे ते पहिले सदस्य असतील. मात्र ते निवडणूक लढवणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल.