मुंबई : शिवसेनेने विमा कंपन्यांना 15 दिवसांची मुदत दिल्यानंतर शेतकऱ्यांना 400 कोटी रुपयांची मदत मिळाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची 400 कोटींची प्रकरणं मार्गी लागल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. तसेच येत्या काही दिवसात 600 कोटींची प्रकरणं मार्गी लावली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.


पीकविमा कंपन्यांच्या संदर्भात मातोश्रीवर (शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे नेते आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.

विमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेने 17 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. या मोर्चानंतर उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना 15 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत आता संपली आहे. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीचा फायदा घेतला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. लवकरच यासंदर्भात उध्दव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार आहेत.

शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने विमा कंपन्यांविरोधात मुंबईत 17 जुलै रोजी धडक मोर्चा काढला होता. या मोर्चात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, पर्यावरणमंत्री रामदास कदम, महापौर विश्वनाथ महाडेश्वर अशा आमदार-खासदारांसह शिवसैनिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर विमा कंपनीला शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. राज्यातील खासगी विमा कंपन्यांना 15 दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावाच लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला होता.