मुंबई : उस्मानाबाद, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील जवळपास 500 शेतकरी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसले आहेत. महापारेषण आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपन्यांनी आमची परवानगी न घेता सरकारचा प्रोजेक्ट आहे असं सांगून आमच्या जमिनीत उच्च विद्युत वाहिनीचे टॉवर उभे केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच टॉवरमुळे जमिनींची किंमत शून्य झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ या जमिनींचा योग्य मोबदला आम्हाला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही आमरण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.


याबाबत बोलताना अॅड. आशिष पाटील म्हणाले की, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर जिल्ह्यातून विविध विद्युत कंपन्यांच्या 765 के. व्ही., 420 के. व्ही., 220 के.व्ही. विद्युत लाईन गेलेल्या आहेत. राज्यात विद्युत वाहिन्यांचे काम सुलभ व्हावे या हेतूने केंद्र शासन आणि राज्यशासन अंगीकृत विविध कंपन्यांकडून विद्युत वाहिन्यांचे टॉवर बसवण्यात आले आहेत. या टॉवरवरून उच्च दाबाचा विद्युत प्रवाह घेऊन अनेक तारा जात आहेत. ज्यावेळी हे काम करण्यात आले, त्यावेळी सदर कंपन्यांनी हे काम शासकीय असल्याचे सांगून दिशाभूल केली. तसेच पोलीसबळाचा वापर करून अनेक ठिकाणी टॉवर बसवले. याचा शेतकऱ्यांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही. तर काही ठिकाणी केवळ जुजबी मोबदला देऊन काम करून घेण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आम्हाला आमच्या जमिनींचा मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


आंदोलनाबाबत बोलताना एक शेतकरी म्हणाले की, या भागातले शेतकरी खूप वर्षांपासून त्यांच्या शेतामध्ये बागायती पिके घेत आहेत. परंतु अनेकांच्या 7/12 वर जिराईत शेती उल्लेख आहे. त्यामुळे बाधित क्षेत्राचा मोबदला हा बागायती जमिनीप्रमाणे देणे अपेक्षित आहे. परंतु सदर कंपन्या जिराईती शेतीप्रमाणे मोबदला देत आहेत. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.


एपीएमसी निवडणुकीचा रणसंग्राम सुरु, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात