मुंबई : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात आंदोलनं होत आहेत. अशातच आता मुंबईतही आंदोलन छेडलं जाणार आहे. ऑगस्ट क्रांती मैदानात एनएसयुआय, छात्रभारतीसह १८ हून अधिक विद्यार्थी संघटना एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध एल्गार पुकारणार आहेत. तसेच काही बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश असणार आहे. हे आंदोलन दुपारी 4 पासून सुरू होणार असून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
अभिनेता फरहान अख्तरने काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून एक ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती. फरहानने सोशल मीडियावर नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन यासंदर्भातील एक फोटो पोस्ट केला. त्याचसोबत फरहानने सांगितले की, याच्याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. फरहान अख्तरने ट्वीट केलं की, 'आपल्या सर्वांना जाणून घेण्याची गरज आहे की, याच्याविरोधात आवाज उठवणं का गरजेचं आहे?, सगळे 19 तारखेला क्रांति मैदान, मुंबईच भेटूया. आता सोशल मीडियावर विरोध करण्याची वेळ संपली आहे.'
फरहान अख्तरसोबतच अभिनेता जावेद जाफरीनेही एक ट्वीट केलं. ज्यामध्ये त्याने ऑगस्ट क्रांती मैदानावर येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच फरहान अख्तर, स्वरा भास्कर, ऋचा चड्ढा, जीशान अय्यूब, सयानी गुप्ता, रेणुका शहाणे आणि हुमा कुरेशी यांसारख्या अनेक कलाकारांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे. याव्यतिरिक्त बॉलिवूड सेलिब्रिटींनी गेल्या रविवारी जामिया मिलीया इस्लामियात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीहल्यावर ट्वीट केले आहे. दरम्यान, नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, दिल्ली सीलमपूर याठिकाणांसह संपूर्ण देशभरात आंदोलन करण्यात येत आहेत.
विरोधकांच भाजप सत्ता छोडे आंदोलन :
केंद्रातील भाजप सरकारने संमत केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या (CAB) विरोधात सर्व विरोधी पक्षा तर्फे ऑगस्ट क्रांती मैदानावर भाजप सत्ता छोडो आंदोलन करण्यात येणार आहे, दुपारी 4 वाजता. या आंदोलनाला एकनाथ गायकवाड, आमदार मधू चव्हाण, चरणसिंग सप्रा, नवाब मलिक, नसीम सिद्दीकी, संजय तटकरे, अबू असीम आझमी, मिराज सिद्दीकी, कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड महेंद्र सिंग आणि कम्युनिस्ट पार्टी, मुंबईचे सरचिटणीस कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्यासह अन्य नेते उपस्थित रहाणार आहेत.
विधेयकात नेमके काय आहे?
नागरिकत्व संशोधन विधेयकाअंतर्गत 1955 च्या नागरिकत्वाच्या कायद्यात बदल करण्याचे प्रस्तावित
या अंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ईसाई शरणार्थींना नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव
एक वर्ष ते 6 वर्षे जे शरणार्थी भारतात राहतात त्यांना नागरिकत्व देण्याचे प्रस्तावित
सध्या भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात 11 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक
संबंधित बातम्या :
CAA Protests | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यासह देशभरात एल्गार