मुंबई : ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने 2018 च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा आज केली. यात 23 भाषांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले. साहित्य विश्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार दरवर्षी घोषित केला जातो. यंदा सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथात्तर गद्य आणि आत्मचरित्र आदी साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. यात मराठी भाषेसाठी अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या काव्य संग्रहास यंदाचा साहित्य अकदमी पुरस्कार देण्यात येणार आहे. गोव्यातील कोकणी कवी निलबा खांडेकर यांचा कवितासंग्रह 'ध वर्डस'ला देखील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.


या पुरस्काराने मी आनंदी आहे. ज्यांना काही चेहरा नाही, ज्यांची कुठे नोंद नाही, अशा घटकांच्या कविता या संग्रहात आहेत. या संग्रहाला पुरस्कार मिळाल्याने मी आनंदी आहे, असे अनुराधा पाटील एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांना कथेतर सृजनात्मक गद्य प्रकारात त्यांच्या 'अॅन इरा ऑफ डॉर्कनेस' या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. इंग्रजी पुरस्कार निवड समितीमध्ये गणेश देवी, सचित्तानंदन आणि प्रो. सुकांता चौधरी यांचा समावेश होता. हिंदीसाठी नंदकिशोर आचार्य यांचा कविता संग्रह 'छीलते हुए अपने को' याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उर्दूत 'शाफ़े किदवई' ला जीवनीच्या 'सवनेह-ए-सर-सैयद- एक बाज़दीद' साठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सर्व विजेत्या लेखकांना पुरस्कार स्वरूपात प्रत्येकी एक-एक लाख रुपये, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. 25 जानेवारी रोजी एका कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा होईल.

या भाषेतील साहित्यकारांना पुरस्कार जाहीर

असमिया - जय श्री गोस्वामी महंत
बाड्ला - चिन्मय गुहा
बोडो - फुकन चन्द्र
डोगरी - ओम शर्मा
गुजराती- रतिलाल बोरीसागर
कन्नड - विजया
कश्मीरी- अब्दुल अहद हाज़िनी
कोंकणी - निलबा खांडेकर
मैथिली - कुमार मनीष
मलयालम- मधुसूदन नायर
मणिपुरी - बेरिल
मराठी- अनुराधा पाटील
ओड़िया - तरूण कांति
पंजाबी - किरपाल कज़ाक
राजस्थानी- रामस्वरूप किसान
संस्कृत - पेन्ना मधुसूदन
संताली - काली चरण
सिंधी - ईश्वर मूरजाणी
तमिल- धर्मन
तेलुगु - बंदि नारायणा स्वामी