मुंबई : मुंबई आयआयटीच्या आजी- माजी विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी मिळून एक अभिनव प्रकारचं संशोधन समोर आणलं आहे. यामध्ये 'द-रिब्रेथर' नावाचे एक प्रोटोटाईप तयार करून कोविड रुग्ण जे व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांनी श्वास सोडल्यानंतर बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्सइड ( CO2) मधून ऑक्सिजन (O2) चा पुनर्वापर करण्याचे संशोधन समोर आणले आहे. एकीकडे ऑक्सिजनची कमतरता देशात आणि राज्यात जाणवत असताना अशा प्रकारच्या संशोधनमुळे ऑक्सिजन सिलेंडरमधून रुग्णाला देण्यात येणारा ऑक्सिजन जास्त वेळ राहून त्याची बचत होईल तर श्वासोच्छ्वासातील बाहेर पडणाऱ्या ऑक्सिजनचा वापर री-ब्रेथरद्वारे होईल व रुग्णाला कमीत कमी ऑक्सिजन हा ऑक्सिजन सिलेंडरमधून लागेल. ज्यामध्ये सिलेंडरमधील ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर बचत होईल. 


कोविड रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कमतरता जाणवत असताना, 'द रीब्रिदर'मुळे ऑक्सिजन वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांना प्रतिमिनिटाला 50 लीटर ऑक्सिजन दिला जातो. त्यातला 1 ते दीड लीटर ऑक्सिजनचा प्रत्यक्षात वापर होतो. 90 टक्के ऑक्सिजन हवेमध्ये वाया जातो. त्यामुळे बॉटल ऑक्सिजनचा वापर योग्य पद्धतीने केला तर लूप सिस्टीममध्ये वापरला तर मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची बचत होईल. 


आयआयटी मुंबईच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक  संतोष नोरोना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या टीमने शोधून काढलेल्या तंत्रज्ञानानुसार सध्या गंभीर अवस्थेतील एका रूग्णासाठी होणारा 9 सिलेंडरचा वापर हा एक किंवा दोन सिलेंडर इतका कमी होणार आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची बचत होणे शक्य होईल. 


रिब्रेथरची काही स्वयंसेवकांवर अनौपचारिकरित्या चाचणी केली गेली आहे. मात्र याबाबत क्लिनिकल चाचण्या अद्याप प्रलंबित आहेत आणि कदाचित यास वेळ लागू शकेल. म्हणूनच संस्थेने आपली कार्यक्षमता दर्शवण्यासाठी हे डिझाईन ओपन सोर्समध्ये प्रसिद्ध केले आहे. प्रोटोटाईपची किंमत अंदाजे 10 हजार  रुपये असून ती मोठ्या प्रमाणात औद्योगिक उपयोगात आणली जाऊ शकते. संस्थेने आता अभियंत्यांना, उत्पादकांना चांगल्या स्केलेबिलिटीसाठी डिझाईनचा अवलंब करणे, त्याची प्रतिकृती तयार करणे किंवा सुधारित करण्यासाठी देखील आमंत्रित केले आहे.