भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन, रेडिमेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा व त्यातून निर्माण झालेला काळाबाजार यामुळे सर्वसामान्य कोविड रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झालेत. अशा रुग्णांना आधार देण्यासाठी शेलार ग्रामपंचायतीने पुढाकार घेत 50 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर अवघ्या 15 दिवसात ग्राम निधी व लोकसहभागा तून उभारले आहे. मात्र, या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाने अजूनही मान्यताच दिली नाही. त्यामुळे सेंटर सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत येऊ शकत नसल्याची खंत शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच अॅड. किरण चन्ने यांनी व्यक्त केली. 


महामारीच्या काळात ग्राम पंचयातीस सहकार्य करण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी विनाकारण खोडा घालून नागरिकांना कोरोना महामारीसारख्या आजारात वेठीस धरण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील सरपंच ऍड किरण चन्ने यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे ऐन महामारीच्या काळात देखील शासकीय कामकाजातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. 


सुमारे 25 हजार लोकसंख्या असलेल्या शेलार ग्रामपंचायतीने स्वतंत्र 50 बेडचे कोविड सेंटर जिल्हा परिषद शाळेत ग्रामनिधीतून उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांनी सहकार्याचा हात पुढे करीत 15 दिवसात शाळेचे रूपांतर सुसज्य कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. शासकीय सर्व नियमांचे पालन करीत निसर्गरम्य वातावरणात हे कोविड सेंटर उभारले आहे. कोविड सेंटर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासाची सोय देखील करण्यात आली आहे. तसेच रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी सुसज्य स्वयंपाक गृह देखील याठिकाणी उभारण्यात आले आहे. 


त्यानंतर शासकीय मंजुरीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार केला गेला. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला गेलेला आरोग्य विभागाच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी कार्यालयातील आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळणारे तहसीलदार तावटे यांनी परवानगी नाकारले. त्यामुळे हे सेंटर तयार होऊनही सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत येऊ शकले नाही, याची खंत अॅड किरण चन्ने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
          
हे सेंटर उभारताना लोक सहभाग सुध्दा मोठा असल्याने सर्वांनाच या कामाबद्दल आस्था आहे. जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांनी सुध्दा या केंद्राबद्दल प्रशंसा केली. परंतु, सरकारी बाबूगिरीने शुल्लक त्रुटी दाखवून परवानगी न देणे म्हणजे सर्वसामान्य गरजवंत रुग्णांच्या जीवाशी खेळण्या सारखे आहे हे स्पष्ट करीत या सेंटरसाठी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, अग्नी व विद्युत यंत्रणेचे परीक्षण ग्रामपंचायतीने स्वखर्चाने करून घेत सर्व अटी शर्तींची पूर्तता केली असतानाही आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण दाखविले जाते हे चुकीचे असल्याचे सांगत, सध्याच्या परिस्थितीत शासन कायद्याबाहेर जाऊन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना आमच्या प्रयत्नांना खो घालण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणा करीत असून हे असंवेदनशील, उदासीन प्रशासन यंत्रणेचे हे अपयश असून कोविड सेंटर तयार असून ते सुरू होऊन जनतेच्या उपयोगी यावे हिची इच्छा असून तसे न झाल्यास रुग्ण दगवल्यास त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शेवटी सरपंच ऍड किरण चन्ने यांनी दिला आहे.