ठाणे : आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरिकाचं योगदान महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. चिनी वस्तू, उत्पादन विकणं बंद करु हे फक्त भारतच करु शकतो, इतकी हिंमत दुसऱ्या कोणत्या देशात नाही, असंही ते म्हणाले. ठाण्यात आयोजित 35व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं उद्धाटन राज्यपालांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.


राज्यपाल पुढे म्हणाले की, "सोने कि चिडीया म्हटला जाणारा भारत समृद्ध देश होता. परकीय आक्रमणानंतरही देशाची वाटचाल सुरुच राहिली. त्यानंतरही महापुरुषांच्या बलिदान आणि दूरदृष्टीने भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले. याच भारताने जगाला विश्वबंधुत्व आणि वसुधैवकुटुंबकमचा संदेश दिला." तसंच अमेरिकेचे उदाहरण देत, भारतातील लोकशाही किती सर्वार्थाने समृद्ध आहे, हे कोश्यारी यांनी सांगितलं.


यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष संजय केळकर, तसेच आमदार निरंजन डावखरे व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटनाच्या सुरुवातीला कोश्यारी यांनी उपस्थितांशी मराठीत संवाद साधला.


भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, "आपल्या देशाला संत, थोर महापुरुष आणि व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्याच विचारांवर देश चाललाय हे आपले वैशिष्ट्य आहे. आपला इतिहास हेच देशाचे प्रजातंत्र आहे. अनेक आक्रमणानंतरही आपला देश जिवंतच नाही तर समृद्ध आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, पण हे तेव्हाच होईल जेव्हा आपण आत्मनिर्भर बनू. चिनी वस्तू, उत्पादन विकणं बंद करु हे फक्त भारतच करु शकतो, इतकी हिंमत दुसऱ्या कोणत्या देशात नाही. पूर्वी धान्याची आयात व्हायची आता धान्य गोदामांमध्ये सडतयं, इतका देश सुजलाम सुफलाम आहे."

देशाला समृद्ध बनवणे हे मुंगेरीलाल के हसीन सपने नाही, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिलं पाहिजे असेही ते म्हणाले. तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जगभरातील 180 देश एकत्र येतात ही बाब अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे, असे म्हणत त्यांनी मोदींचे कौतुकही केले.