मुंबई : मुंबईत नवी स्कीम सुरु झाली आहे. या स्कीमद्वारे 25 लाखात वन बीएचके फ्लॅट मिळणार आहे. पण हा फ्लॅट कल्याण किंवा डोंबिवलीत नसून चक्क हवेत तरंगणारा आहे.


विशाल, वेगवान आणि राजेशाही असलेल्या या फ्लॅटचा ताबा तुमच्याकडे फक्त 16 तासांसाठी असेल. आतापर्यंत लंडन, अबुधाबी आणि न्यूयॉर्कपर्यंत मर्यादित असलेल्या ए 380 एअरबसची राजेशाही स्वारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवतरली आणि विमान उड्डाण इतिहासात सोनेरी पान जोडलं गेलं.

 
1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जगातल्या सर्वात महागड्या विमान प्रवासाचा अध्याय सुरु झाला. आखाती देशातल्या सर्वात मोठ्या एतिहाद या विमान कंपनीने न्यूयॉर्क ते मुंबई हा नॉनस्टॉप प्रवास करणारी सेवा सुरु केली. ज्याचं वनवे एअर फेअर आजवरचं सर्वात महागडं ठरलं आहे.

 
अबुधाबी ते मुंबई या प्रवासासाठी एतिहादचं शुल्क 3 लाख 31 हजार आहे. लंडन ते मुंबई या प्रवासासाठी तब्बल 17 लाख 25 हजार मोजावे लागतील, तर न्यूयॉर्क ते मुंबई या प्रवासासाठी तब्बल 25 लाख 22 हजार मोजावे लागणार आहेत.

 
या विमानाच्या एका तिकीटाच्या रकमेमध्ये मुंबईबाहेर एखादा फ्लॅटही बुक करता येतो. त्यामुळे इतके पैसे नक्की मोजावे लागणाऱ्या या ए 380 एअरबसमध्ये नेमकं आहे तरी काय असा प्रश्न पडणं साहजिक आहे. एतिहादच्या या विमानामध्ये जणू अपार्टमेन्ट वसलं आहे. समजा तुम्ही मुंबई ते न्यूयॉर्क या प्रवासासाठी 25 लाखांचं तिकीट खरेदी केलंत तर 16 तासांसाठी हा अख्खा फ्लॅट तुमचा  असेल.

 
16 तासांचा प्रवास म्हणजे दैनंदिन आणि अत्यावश्यक गोष्टी आल्याच. त्यामुळे स्वयंपाकघर, शॉवर यासह अनेक गोष्टींची सोय इथे करण्यात आली आहे. लिव्हिंग रुममध्ये गप्पा मारताना कंटाळा आला तर विश्रांतीसाठी अख्खा डबल बेड तुमच्यासाठी सज्ज आहे.

 
कॉन्फरन्स हॉल... बार काऊंटर... टेक्नो फ्लोअर... आणि बरंच काही... एका शहरात जे जे काही मिळतं, ते ते या हवेतल्या शहरात मिळतं असं म्हणायला हरकत नाही. यासाठी एतिहादनं मुंबईची निवड केली कारण महाराष्ट्र हे भारतातल्या प्रगत राज्यांपैकी एक आहे.

 

 

शिवाय या राज्याची राजधानी मुंबई कॉस्मॉपॉलिटन सिटी असून ती डायनॅमिक आहे, प्रसिद्ध आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला नाविन्याची हौस आहे. आगामी हॉलिडेजमुळे या सेवेला तुफान प्रतिसाद मिळण्याची आशा एतिहादला आहे.

 
भलेही ही अजस्त्र विमानं प्रगत राष्ट्रांमध्ये तयार होत असतील, पण त्यांचं मार्केट हे भारत असल्याचं या कंपन्यांच्या लक्षात आलंय आणि म्हणूनच एतिहादसारख्या कंपन्या भारतीय प्रवाशांना पायघड्या घालत आहेत. बस, लोकल आणि मेट्रोच्या दरवाढीनंतर ज्या देशात
आंदोलने होतात. त्याच देशात 25 लाखांचं एकेरी प्रवासाचं तिकीट घेणारेसुद्धा आहेत, हेच या बातमीतलं वेगळेपण आहे.