BMC Covid Scam: कथित कोविड सेंटर (Covid Centre) गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. ईडीने जवळपास 17 तास सूरज चव्हाण यांच्या घरी चौकशी केली. त्यानंतर सोमवारी (26 जून) रोजी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले. ईडीने सूरज चव्हाण यांच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा केले आहेत. मात्र यामागे नेमकं कोण आहे याचा तपास सध्या ईडीकडून करण्यात येत आहे.
कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांच्यासह इतर 15 ते 16 महापालिका अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी छापे टाकले होते. दरम्यान या छाप्यांमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. तसेच व्हॉट्सअॅप चॅटमध्येही पालिका अधिकाऱ्यांना पैसे दिल्याबाबतचे संभाषण आढळले आहे.याशिवाय जप्त करण्यात आलेल्या एका डायरीमध्येही पालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या पैशांच्या नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे ईडी यासंदर्भात संशयितांचा अधिक तपास करत आहे.
या प्रकरणांमध्ये मध्यस्थींच्या सहभागाचे पुरावे देखील ईडीला सापडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित घोटाळ्यात राजकीय व्यक्ती, पालिका अधिकारी, मध्यस्थ आणि वितरक किंवा कंत्राटदार यांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. तर आता सूरज चव्हाण यांनी नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं, तसेच ते पालिकेचा अधिकारी नसूनही त्यांनी पालिकेच्या कामकाजामध्ये दखल का दिली याची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणात मुंबई महानगर पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं देखील नाव समोर येत आलं होतं. मात्र किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आता ईडीकडून करण्यात येत आहे.
नेमकं कोणत्या प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विशिष्ट संस्था कोविडमुळे मृत झालेल्या रुग्णासांठी ज्या बॉडी बॅगची आवश्यकता होती ती इतर रुग्णालयांना 2000 रुपयांना विकण्यात आली. मात्र याच कंपनीने पालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाला ही बॅग 6800 रुपयांनी विकली. दरम्यान हे सर्व पालिकेच्या तत्कालीन महापौर यांच्या सूचनेनुसार हे कंत्राट देण्यात आले होते असं तपासात समजल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच कोविडच्या उपचारांसाठी ज्या दरात औषधं पालिकेला पुरवण्यात येत होती तीच औषध खुल्या बाजारात 25-30 टक्के कमी दराने विकण्यात येत होती असं देखील सांगण्यात येत आहे. तर ही बाब पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असताना देखील त्यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जात आहे. तर कथित कोविड सेंटर घोटाळा हा 4000 कोटी रुपयांचा असल्याचं सागंण्यात येत आहे.