Mumbai-Goa Vande Bharat Express : कोकण रेल्वे मार्गावर लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार आहे. उद्या म्हणजेच 27 जून 2023 रोजी मडगाव इथे कोकण रेल्वेमार्गावरील (Konkan Railway) वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे व्हर्च्युअली मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला (Mumbai-Goa Vande Bharat Express) हिरवा कंदील दाखवणार आहेत. कोकणात होणारा पाऊस पाहता सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून केवळ तीन वेळा धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाळा संपला की वंदे भारतचं वेळापत्रकात बद होऊन ट्रेन आठवड्यातून सहा वेळा धावेल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. रविवारी ही ट्रेन बंद असेल.
वंदे भारत एक्स्प्रेसचं वेळापत्रक
वंदे भारत एक्स्प्रेस ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबईहून धावेल. तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही ट्रेन गोव्यावरुन धावेल.
ही ट्रेन सीएसएमटी स्टेशन, मुंबईवरुन सकाळी 5.32 वाजता सुटेल आणि मडगाव स्टेशन, गोव्याला दुपारी 3.30 वाजता पोहोचेल. हा प्रवास दहा तासांचा असेल.
तर परत येताना ही ट्रेन मडगावहून दुपारी 12.20 वाजता निघेल आणि मुंबईला रात्री 10.25 वाजता पोहोचेल. हा प्रवास देखील दहा तासांचा असेल.
तर मान्सून गेल्यानंतर या ट्रेनचा वेग वाढवला जाईल आणि 586 किमी अंतर केवळ 7 तास 50 मिनिटांत कापेल. यादरम्यान ट्रेनला अकरा थांबे असतील.
सध्या कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेस ही वेगवान ट्रेन धावत आहे. ही ट्रेन 586 किमी अंतर 8 तास 50 मिनिटात पार करते. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांनाचा एक तास वाचणार आहे.
महाराष्ट्रातून धावणारी चौथी वंदे भारत एक्स्प्रेस
महाराष्ट्रातून सध्या तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. मुंबईहून शिर्डी, मुंबईहून सोलापूर आणि मुंबईहून गांधीनगर या तीन एक्स्प्रेस आहेत. या तिन्ही ट्रेनमध्ये 70 टक्के लोक प्रवास करतात. उद्या लोकार्पण होणारी मुंबई-गोवा ट्रेन ही या महाराष्ट्रातून धावणारी चौथी वंदे भारत एक्स्प्रेस असेल.
एकाच दिवसात पाच वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण होणार
भारतात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एकाच दिवशी पाच वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा कंदील दाखवणार आहे. यापैकी दोन ट्रेन मध्य प्रदेश, एक कर्नाटक, एक बिहार आणि महाराष्ट्रातून धावणार आहेत. बंगळुरु-हुबळी-धारवाड, मुंबई-गोवा, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर अशा मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. या रेल्वेच्या लोकार्पणांचा कार्यक्रम यापूर्वीच पार पडणार होता. परंतु ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर या गाड्यांचं लोकार्पण पुढे ढकलण्यात आलं.
हेही वाचा