भिवंडी : भिवंडी शहरातील पद्मानगर येथील दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रुम मधील स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली आहे. यात घरात सोबत झोपलेल्या एका अकरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आई आणि एक मुलगी जखमी झाली आहेत.

भिवंडी शहरातील पदमानगर परीसरातील मार्क॔डेय नगर येथील गंगाजमुना ही तिस वर्ष जुनी दुमजली अरुंद इमारत होती. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत उमेश एनगुंदला याची पत्नी स्नेहा आणि दोन मुली मागील दोन वर्षांपासून भाड्याने राहत होते.

पती उमेश कामावर जाऊन आल्यावर रात्री उशीरापर्यंत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत परिसरातच बसला असता ही घटना घडली. घटना घडली त्या वेळी घरात उमेश यांच्या पत्नी स्नेहा, मुलगी साक्षी आणि प्रगती होत्या. रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या खोलीतील स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळले असता त्या मधील प्लास्टरचा मोठा हिस्सा मुलगी साक्षी हिच्या डोक्यात आणि छातीवर पडला. या दुर्घटनेत सहावीमध्ये शिकणाऱ्या साक्षी या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आई स्नेहा आणि बहीण प्रगती यांच्यावर कमी प्रमाणात प्लास्टर पडल्याने त्या जखमी झाल्या. घटनेनंतर साक्षीला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

या दुर्घटनेबाबत दुर्दैवी बाब म्हणजे महानगरपालिका आपत्कालीन कक्ष आणि अग्निशामक दलास या घटनेची माहिती तिन तासांनंतर समजली.