नाशिक : मुंबईत गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) जवळच्या समुद्रात स्पीड बोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झाला. यात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. बुधवारी साडे चार वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला असून नौदलाची स्पीडबोट प्रचंड वेगात येऊन आदळल्याने गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाला निघालेली 'नीलकमल' ही फेरीबोट (Elephanta Boat Accident) प्रवाशांसह उलटली. या बोटीतील 99 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र या अपघातात नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पिंपळगावच्या आहेर दाम्पत्यासह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  


दम्याच्या आजारावर उपचारासाठी पिंपळगावचे राकेश आहेर हे दोन दिवसापूर्वी पत्नी व आपला मुलासह मुंबई येथे गेले होते. रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेऊन ते सायंकाळी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. पण नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटला दिलेल्या धडकेत आहेर कुटुंबातील तिघांचा अंत झाला. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेने पिंपळगाव बसवंतच्या आहेर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबिती


दरम्यान, या अपघातात वाचवण्यात आलेल्या प्रत्यक्षदर्शीने एबीपी माझाशी संवाद साधला. तो म्हणाला की, नीलकमल बोट जवळपास 10 किमी समुद्रात गेल्यांनंतर समोरून आलेल्या एका स्पीड बोटीने नीलकमल बोटीला जोरदार धडक दिली. नीलकमल बोटीमध्ये पाणी यायला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला सांगण्यात आले. पण तोपर्यंत बोट पाण्यात बुडाली होती. मी जवळपास 15 मिनिटं पाण्यामध्ये पोहोत होतो. धडक दिलेल्या स्पीड बोटीमध्ये 8 ते 10 लोक होते, असे त्यांनी सांगितले आहे. 


मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत 


मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या बोट अपघाताप्रकरणात मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Elephanta Boat Accident : मुंबईच्या वडापावमुळे बालंबाल बचावले त्रिपाठी कुटुंब, लहान मुलांनी खाण्याचा हट्ट धरला अन् 'नीलकमल' बोट..., नेमकं काय घडलं?


Elephanta Boat Accident : मोठी बातमी! मुंबई बोट अपघातात तीन नव्हे तर 13 जणांचा मृत्यू; नवीन इंजिनची टेस्टिंग सुरू असताना नेव्हीची बोट आदळली