मुंबई: गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात स्पीड बोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. काल (बुधवारी) साडे चारच्या दरम्यान नौदलाची स्पीडबोट प्रचंड वेगात येऊन आदळली आणि गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाला निघालेली 'नीलकमल' ही फेरीबोट प्रवाशांसह उलटली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे, सोबतच 99 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातातील काही प्रवासी बेपत्ता असल्याचा संशय आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. 'नीलकमल' बोटीवर आदळलेल्या नौदलाच्या स्पीडबोटीवरील दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. दरम्यान या अपघातातील नीलकमल या बोटीमध्ये जाणारे एक कुटूंब आपल्या मुलांच्या हट्टासाठी थांबल अन् वाचलं. 


या घटनेनंतर त्रिपाठी कुटूंबाने नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. हे कुटूंब एलिफंटा लेण्या पाहण्यासाठी नीलकमल या फेरीबोटीतून जाणार होतं. मात्र, त्यांच्या लहान मुलांनी वडापाव खाण्याचा हट्ट धरला त्यामुळे संपूर्ण कुटूंब वाचल्याची प्रतिक्रिया त्रिपाठी कुटूंबातील सदस्यांनी दिली आहे. 


मुलाचा हट्ट आणि वडापावमुळे वाचलो


गोरखपूर मधील त्रिपाठी कुटुंबीय मुंबई फिराण्यासाठी आले होते. त्यांनी काल (बुधवारी) एलिफंटा लेण्यांची पाहण्यासाठी जाण्याचा प्लॅन आखला होता. त्यासाठी ते गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचले. याच अपघातग्रस्त नीलकमल फेरीबोटवर ते चढणार होते, मात्र कुटुंबातील लहान मुलांनी वडापाव खाण्याचा हट्ट धरल्याने सर्वजण वडापाव खाण्यासाठी थांबले. त्यामुळे ते या फेरीबोटवर चढू न शकल्याने वाचले. अखेर मुलांच्या हट्टामुळे वाचलो, अशा भावना अंजली त्रिपाठी यांनी व्यक्त केली आहे. 


नेमकं काय घडलं? 


प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला इंडियन नेव्हीच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. या जोरदार धडकेत नीलकमल बोट बुडाली. अपघातावेळी बोटीमध्ये शंभरच्या वर प्रवासी आणि 5 बोटीचे सदस्य होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय. दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला हा अपघात घडला. 


 प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं? 


या अपघातात वाचवण्यात आलेल्या प्रत्यक्षदर्शीने एबीपी माझाशी संवाद साधला. तो म्हणाला की, नीलकमल बोट जवळपास 10 किमी समुद्रात गेल्यांनंतर समोरून आलेल्या एका स्पीड बोटीने त्याला धडक दिली. नीलकमल बोटीमध्ये पाणी यायला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला सांगितलं. पण तोपर्यंत बोट पाण्यात बुडाली होती. मी जवळपास 15 मिनिटं पाण्यामध्ये पोहोत होतो. धडक दिलेल्या स्पीड बोटीमध्ये 8 ते 10 लोक होते.