Shiv Sena Affidavit : एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर आता शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. शिवसेनेवर निष्ठा आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे मागितलं आहे. शिवसैनिकांकडे एकनिष्ठतेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आली आहे. यासाठी पक्षाच्या आमदारांपासून उपशाखाप्रमुखांपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृ्त्त्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करत आहे, असा मजकूर असलेल्या प्रतिज्ञापत्रावर आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांकडून स्वाक्षरी घेतली जात आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत अस्वस्थता आहे. त्यात आपण शिवसेनेतच असल्याच्या बंडखोर आमदारांच्या दाव्याबाबत चित्र स्पष्ट झालं नसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. बंडाचा झेंडा आणखी कोण कोण हाती घेणार याविषयी चर्चा रंगू लागली आहे. त्याचबरोबर बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या शाखा स्तरावरून पाठिंबा मिळण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता सावधगिरी म्हणून पक्षप्रमुखांबरोबर राहिलेले आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्यात येत आहे. 


प्रतिज्ञापत्रात काय लिहिलं?
"माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनश्च पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टय़े पूर्ण करण्यासाठी मी सदैव कायर्रत राहीन अशी ग्वाही देतो," असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.


प्रतिज्ञापत्र देणं म्हणजे कार्यकर्त्यांवर अविश्वास : दीपक केसरकर 
तर दुसरीकडे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनीही या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. "पक्षाकडून आता प्रतिज्ञापत्र घेतली जात आहेत. लोकांना प्रेमाने बांधवं लागतं. प्रेमाचं बंधन बाळासाहेबांनी आम्हाला बांधलं. प्रतिज्ञापत्र देणं म्हणजे कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवत आहात," असं दीपक केसरकर म्हणाले.


पक्षप्रमुखांकडेच प्रतिज्ञापत्र मागितलं तर... मनसेची टीका
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्र मागण्याच्या शिवसेनेच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टीका केली आहे. आधी शिवबंधन झालं, आता प्रतिज्ञापत्र घेणार आहेत. पण उद्या समजा एखाद्या शिवसैनिकाने पक्षप्रमुखांकडे तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्त्वाचे विचार सोडणार नाहीत असं प्रतिज्ञापत्र मागितलं तर त्यांच्याकडून असं प्रतिज्ञापत्र दिलं जाईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.


Shivsena : Eknath Shinde यांच्या बंडानंतर शिवसेना सावध, पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र मोहीम