कल्याण : कल्याणमध्ये एकाच दिवशी साथीच्या तापाने तीन बळी गेले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलं आणि एका तरुणाचा समावेश आहे. यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाने कल्याणमध्ये धाव घेतली असून या तिन्ही मृत्यूंची चौकशी सुरू केली आहे.

कल्याणच्या नारायणवाडी परिसरात राहणारी चार वर्षीय तनुजा सावंत आणि वाडेघर परिसरात राहणारा श्लोक मल्ला यांना मेंदूज्वराची लागण झाली होती. उपचारादरम्यान श्लोक याचं ब्रेन डेड झाल्यानं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तर तनुजा हिचं ब्रेनडेड झाल्यावर तिला रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या तपासणीत त्यांना मेंदूज्वर म्हणजेच एन्सेफाल्टीज झाल्याचं निदान झालं आहे.

त्यानंतर गुरुवारीच कल्याणच्या गणेशवाडी परिसरात राहणाऱ्या शुभम शिवदे याचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्याच्यावर मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी रात्री उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. एकाच दिवशी झालेल्या या तीन घटनांमुळे शासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याणमध्ये धाव घेत याची चौकशी सुरू केली आहे. अशाच प्रकारच्या मेंदूज्वरामुळे उत्तरेत अनेक बळी गेले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा धास्तावली असून कल्याणमध्ये साथीच्या तापांवर नियंत्रण ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.