मुंबई : कोरोनामुळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण घरात बसून आहेत. त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाले आहेत. यापैकी काही परिणाम हे दीर्घकाळ परिणाम करणारे आहेत. अशा काळात त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी असं पुस्तक येणं आवश्यक होतं असं प्रतिपादन एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी केलं.
एबीपी माझाच्या स्टुडियोत डॉ. आनंद नाडकर्णी लिखित ‘करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस’ पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. एखाद्या वृत्तवाहिनीच्या स्टुडियोत एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजीव खांडेकर यांनी यापुढे असे प्रकाशन समारंभ अन्य वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांच्या कार्यालयात होतील अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी कोरोनाकाळात विविध वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून कोरोना काळात मानसिक स्वास्थ्य कसे राखावे याबाबत मार्गदर्शन केले होते. या सर्व लेखांचे संकलन करून ‘करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस’ या नावाने एक पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाचे एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते एबीपी माझाच्या स्टुडियोत; प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे आणि मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर उपस्थित होते.
यावेळी पुस्तकाबाबत माहिती देताना डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सांगितले, कोरोना काळात प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करीत असतानाच वेबिनारच्या माध्यमातूनही मार्गदर्शन करीत होतो. एबीपी माझाच्या कट्ट्यावर येऊन जनतेच्या मनातील नैराश्य घालवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 17 च्या आसपास ऑडियो लेखमाला तयार केल्या आणि अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेखही लिहिले. कोविडनंतरच्या काळात कसे वागायचे याचे मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे असेही त्यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल डॉ. आनंद नाडकर्णी यांचे अभिनंदन करतानाच वेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि एबीपा माझाचे कौतुकही केले. डॉ. सुपे म्हणाले, कोरोना काळात आपण सगळे विविध टप्प्यातून गेलो. काय करावे हे कोणालाच कळत नव्हते. लोकांची प्रतिक्रिया नैराश्याची होती. आता पुनश्च हरिओम झाल्यानंतर हळूहळू सगळे सुरु झाले आहे. पण आपण आजही पाच-सहा विशिष्ट परिस्थितीत आहोत. मात्र, आपण सावध आहोत. अशा परिस्थितीत मन खंबीर करण्याची आवश्यकता असून त्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे असेही ते म्हणाले.
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या लेखांचे पुस्तक तयार करण्याची विनंती केली होती. राजीव खांडेकर यांनी स्टुडियोत पुस्तक प्रकाशन करण्याचे आश्वासन देऊन आम्हाला प्रोत्साहित केले. त्यामुळेच हे पुस्तक आकार घेऊ शकले अशी माहिती मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांनी यावेळी बोलताना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदा कदम यांनी केले.
Dr. Anand Nadkarni | मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णींच्या 'करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस' पुस्तकाचं प्रकाशन