डोंबिवलीत निवडणुकीसाठी व्यायामशाळा ताब्यात, रस्त्यावर व्यायाम करुन खेळाडूंकडून निषेध
एबीपी माझा वेब टीम | 20 Mar 2019 10:44 AM (IST)
डोंबिवली पूर्वेच्या संत सावळाराम महाराज क्रीडासंकुलात महापालिकेची व्यायामशाळा आणि जलतरण तलाव आहे.
कल्याण : निवडणुकीसाठी व्यायामशाळेची जागा घेतल्याने डोंबिवलीकर खेळाडूंनी आज रस्त्यावर व्यायाम करत आपला निषेध नोंदवला. तसंच हा निर्णय रद्द न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला. डोंबिवली पूर्वेच्या संत सावळाराम महाराज क्रीडासंकुलात महापालिकेची व्यायामशाळा आणि जलतरण तलाव आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग या दोन्ही जागा ताब्यात घेणार आहे. याठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्रॉंगरुम तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र अशाप्रकारे तीन-तीन महिने व्यायामशाळा आणि जलतरण तलाव बंद राहणार असेल, तर आम्ही जायचं कुठे असा खेळाडूंचा सवाल आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी खेळाडूंनी रस्त्यावर उतरुन व्यायाम केला. तसंच हा निर्णय बदलला नाही, तर आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालू, असाही इशारा दिला.