मुंबई : राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांची लोकपालच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली आहे. डी. के. जैन यांची लोकपालच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्य सचिवपद रिक्त झालं आहे. मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत यूपीएस मदान आणि अजॉय मेहता यांची नावं आघाडीवर आहेत.


यूपीएस मदान सध्या वित्त विभागाचे सचिव तर अजॉय मेहता मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. मदान यांच्या नावाला राज्य सरकारची अधिक पसंती असल्याची चर्चा आहे.


पिनाकी चंद्र घोष भारताचे पहिले लोकपाल


सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष भारताचे पहिले लोकपाल बनले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोष यांची नियुक्ती केली आहे. भारतात लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी देशाला पहिले लोकपाल मिळाले आहेत.


लोकपालांची नियुक्ती करण्यासाठी एक विशेष निवड समिती बनवण्यात आली होती. या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि प्रसिद्ध विधिज्ज्ञ मुकुल रोहतगी यांचा समावेश आहे.


तत्पूर्वी लोकपालच्या अध्यक्षपदासाठी 20 जणांचे अर्ज आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने त्यापैकी 10 जणांची निवड केली. त्यानंतर निवड समितीने या 10 जणांचा विचार करुन पी. सी. घोष यांची निवड केली आहे.


VIDEO : माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा | एबीपी माझा