मुंबई : कवळी गिळली जाऊन अन्ननलिकेत अडकल्यामुळे मुंबईतील एका वृद्धाचे प्राण कंठाशी आले होते. परंतु डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवदान दिलं.
65 वर्षीय अब्दुल गणी अहमद खान यांचा एक दात पडल्यामुळे त्या जागी कृत्रिम दात असलेली कवळी लावली होती. अब्दुल गणी रोज रात्री ही कवळी काढून सकाळी लावत असत.
कवळी लावून नाश्ता करताना त्यांनी नकळत कवळी गिळली. सुरुवातीला त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. एक्स-रे काढल्यावर त्यात कवळी दिसली नाही, परंतु तीन दिवस त्यांना प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे ते काहीही खाऊ शकत नव्हते.
एका तज्ञ डॉक्टरांनी त्यांना चेंबुरच्या झेन रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला दिला. तिथे डॉ. रॉय पाटणकर आणि डॉ. तन्वीर मजिद यांनी तपासलं असता ही कवळी त्यांच्या अन्न नलिकेत अडकल्याचं निष्पन्न झालं.
शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. परंतु डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी करुन त्यांच्या पोटातून तब्बल सहा सेंटीमीटर लांबीची प्लास्टिकची कवळी बाहेर काढून अब्दुल गणी यांना जीवदान दिलं.