मुंबई : गोंदिया –भंडारा लोकसभा मतदारसंघातील 49 ठिकाणी उद्या (30 मे 2018) पुन्हा मतदान घेतले जाणार आहे. , ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
30 मे 2018 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फेरमतदान घेण्यात येणार आहे. फेरमतदान असणाऱ्या क्षेत्रात मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे 30 मे रोजी कोरडा दिवस लागू करण्यात आला आहे.
गोंदिया-भंडारा मतदारसंघात 25 टक्के मशिन्स बंद पडल्याने मतदानावर परिणाम झाला होता. अनेक तास मतदार उन्हा-तान्हात ताटकळत उभे होते.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात फेर मतदान होणार आहे :
61-भंडारा विधानसभा- 302- अडयाळ, 320नवेगाव, 318-उमरी, 335-पिंपळगाव, 403-पवनी, 405-पवनी, 374-खैरी दिवाण, 314-पिलांद्री, 317-केसलवाडा,322-पाथरी पुर्नवसन, 362-लोणारा, 363-लोणारा, 428-वलनी, 429-वलनी एकूण 14 केंद्र.
62- साकोली विधानसभा-306-पारडी, 316-मुरमाडी, 292-तई बु., 287- घोडेझरी एकूण 4 केंद्र. 63-अर्जुनी मोर विधानसभा-108-बोथली, 159-मानेरी एकूण 2 केंद्र. 64-तिरोडा विधानसभा- 45-अत्री, 97-दवनीवाडा, 102-पिपरटोला, 108-विहीरगाव, 205- भजेपार, 215-पिंडकेपार, 38-मुरदाळा, 52-पालडोंगरी एकूण 8 केंद्र. 65-गोंदिया विधानसभा- 50-सोनपूरी, 78-चारगाव, 94-रतनारा, 115-कामठा, 116-कामठा, 117-कामठा, 123-लांबटोला, 169-गोंदिया, 176A-गोंदिया, 194-गोंदिया, 200-गोंदिया, 206-गोंदिया, 218-गोंदिया, 225-गोंदिया, 233-गोंदिया,240-गोंदिया, 250-गोंदिया, 253-गोंदिया, 271-गोंदिया, 276-गोंदिया, 303 A- फुलचुर एकूण 21 केंद्र असे एकूण 49 मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे.
पटोलेंच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक
पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि आता काँग्रेसमध्ये असलेल्या नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या मतदारसंघात 28 मे रोजी मतदान पार पडले.
जिल्हाधिकाऱ्यांची बदली
गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडून जिल्हा निवडणूक अधिकारीपदासह जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याजागी नागपूरच्या जिल्हा परिषद सीईओ कादंबरी भगत-बलकवडे यांची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. काल 28 मे रोजी भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीसाठी अभिमन्यू काळे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात होते.
भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पडल्याची अनेक प्रकरणं पुढे आली. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी तब्बल 450 ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवडणुकीच्या कामातून बाजूला करण्यात आलं आहे.
रिंगणातील उमेदवार
राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.
भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी केली असली, तरी ही जागा काँग्रेसला जाईल आणि नाना पटोले उभे राहतील, अशी धारणा होती. मात्र राष्ट्रवादीने जागा सोडली नाही आणि प्रफुल्ल पटेल स्वतःही उभे राहिले नाहीत. मात्र दोघांनी अत्यंत जुनं वैर मिटवलं. दोघांनीही राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांच्यासाठी प्रचार केला.
राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे येऊन गेले, तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर जोर लावला आहे.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा क्षेत्र असून त्यापैकी सहा भाजप, तर एक काँग्रेसकडे आहे.