Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde - DCM Devendra Fadnavis) यांच्यामध्ये सारं काही आलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकाच व्यासपीठावर येणे टाळले आहे. काल दिवसभर दोन्ही नेत्यांचे सोबत कार्यक्रम होते परंतु हे नेते एकमेकांसोबत कार्यक्रमात आले नाहीत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न पडलाय. कारण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा वाढलाय का? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्याचं कारण म्हणजे काल दिवसभर एकत्रित दौरा असूनही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच व्यासपीठावर येणे टाळलं.
जरा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकूया.
मुख्यमंत्री शिंदे यांचे रविवार, 16 ऑक्टोबर रोजीचे कार्यक्रम
सकाळी 11 वा.
'स्टार्टअप वीक' व 'स्टार्टअप यात्रा' मधील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम
स्थळ - राजभवन, मुंबई.
दुपारी 2 वा.
श्रीमद् भागवत कथा ज्ञान महायज्ञ
*स्थळ* - टीएमसी मैदान, आनंद नगर ठाणे
दुपारी 4 वा.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आयोजित भव्य सत्कार समारंभ
स्थळ - हायलँड गार्डन्स मैदान, बाळकुम, ढोकाळी, ठाणे (प.)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम
सकाळी 10.15 वाजता : मुंबई वाहतूक पोलिसांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन, अपोलो क्लिनीक कुलाबा, मुंबई
सकाळी 11 वाजता : महाराष्ट्र स्टार्टअप वीक आणि महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा पुरस्कार वितरण, राजभवन, मुंबई
दुपारी 1 वाजता : क्रेडाई-एमसीएचआय प्रॉपर्टी एक्स्पो, एमएमआरडीए मैदान, मुंबई
दुपारी 2.10 वाजता : श्रीमद् भागवत कथा, टीएमसी ग्राऊंड, वाय. के. हॉस्टेलसमोर, आनंदनगर, ठाणे
दुपारी 3 वाजता : ऑल इंडिया बंजारा सेवा संघातर्फे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा भव्य सत्कार समारंभ, हायलँड गार्डन सिटी, ठाणे पश्चिम
तीन कार्यक्रम एकत्रित मात्र एकाही कार्यक्रमाला दोघं एकमेकांसमोर आले नाहीत
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे काल दिवसभरात तीन कार्यक्रम एकत्रित होते. मात्र एकाही कार्यक्रमाला दोघं एकमेकांसमोर आले नाहीत. राजभवनावरील कार्यक्रमाला जाणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळलं आणि काल त्यांनी थेट ठाणे गाठलं. ठाण्यात काही पक्षप्रवेश असल्याचे सांगून काल दिवसभर एकनाथ शिंदे ठाण्यातच होते.
खरंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही ठाण्यात होते ठाण्यातील भागवत कथा आणि बंजारा समाजाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. आता देवेंद्र फडणवीस ठाण्यात असताना एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला येतील अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. त्यामुळे नेमकं बिनसले काय याची चर्चा सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा या निवासस्थानी बैठक झाली. यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून चर्चा झाल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकमत होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आणि याच नाराजी नाट्यामुळे शिंदे आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर येण्याचं टाळतात का असा सवाल विचारला जातोय.
याआधीही टाळाटाळ केल्याचं समोर
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांसोबत कार्यक्रमाला जाणं टाळण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी मीरा-भाईंदर येथे 11 ऑक्टोबर रोजी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या कार्यक्रमालाही देवेंद्र फडणवीस यांनी जाणं टाळलं होतं
मीरा भाईंदरचे महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्यावर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा आहे. ढोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपच्या नेते नरेंद्र मेहता यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली असा त्यांच्यावर आरोप आहे. तर ढोले हे एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील असल्याचे सांगितलं जातं. यामुळेच फडणवीस यांनी मीरा-भाईंदरच्या कार्यक्रमाला जाणं टाळल्याचे बोलले जाते.
राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येऊन शंभर दिवस लोटले आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ न पाळण यावरून देवेंद्र फडणवीस शिंदे यांच्या कारभारावर नाराज असल्याचे सांगितले जाते. आता शिंदे आणि फडणवीस यांच्यातील ही दूरी कमी होणार की वाढणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.