मुंबई : दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना आज चौकशीसाठी दुपारी एक वाजता मुंबईतील मालवणी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार आहे. दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी त्यांना कोर्टाने 10 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. दिशा सलियान प्रकरणात राणेंनी केलेल्या वक्तव्यांनंतर महिला आयोगाच्या निर्देशानुसार त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या प्रकरणात आज नारायण राणे आणि नितेश राणे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावतील. 


नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आपल्याकडे असलेली माहिती आणि पुरावे पोलिसांना सादर करतील. त्यानंतर पोलिसांकडे या प्रकरणा संदर्भातले धागेदोरे शोधण्यासाठी काही प्रश्न उपस्थित करु शकतात, ते प्रश्न पुढीलप्रमाणे असू शकतील.


- दिशासोबत कायम राहणारा रोहन रॅाय कुठे आहे? 
- सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज कुठे आहे? 
- दिशा सालियनचे मोबाईल लोकेशन कुठे आहे? 
- अन्य कोणाचे लोकेशन मॅच करतात? 
- दिशा बिल्डिंगच्या बाहेर कशी पडली? 
- शवविच्छेदन अहवाल कुठे आहे? 
- शवविच्छेदन अहवाल 11 तारखेला का झाला?
- पंचनामा उशिरा झाला आहे हे खरं आहे का? 
- इस्कॉन टेम्पलच्या बाजूला पार्टी होती?


'खेल आपने शुरु किया है, हम खत्म करेंगे', नितेश राणेंचं ट्वीट; आज राणे पितापुत्र चौकशीसाठी हजर राहणार


दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांची या वक्तव्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. 


दिशाच्या पालकांची महिला आयोगाकडे धाव
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिशा सालियनच्या आई-वडीलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राणेंच्या आरोपांमुळे दिवगंत दिशाची नाहक बदनामी होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाने मालवणी पोलीस ठाण्याकडून दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल मागितला होता. 


मालवणी पोलिसांचा अहवाल काय?
दिशाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून तिच्यावर कोणतेही अत्याचार करण्यात आले नव्हते असे अहवालात नमूद करण्यात आले होते. मालवणी पोलिसांच्या अहवालानंतर राज्य महिला आयोगाने नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 


खेल आपने शुरु किया है...: नितेश राणे यांचं ट्वीट
'खेल आपने शुरु किया है, हम खत्म करेंगे न्याय मिलेगा' असं म्हणत दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंनी ट्वीट केलं आहे.  सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करणार असं सांगत नितेश राणेंनी #JusticeForDishaSalian असा हॅशटॅग देत ट्वीट केलं आहे.