मुंबई : पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात प्रॉपर्टी सेलकडून एका दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आहे. अभिजीत बोंबले (41) असं अटक केलेल्या दिग्दर्शकाचं नाव आहे. अभिजीत बोंबले अॅडल्ट कन्टेन्ट बनवण्याचं काम करत असल्याचं प्रॉपर्टी सेलच्या तपासात निष्पन्न झालं आहे. ज्यानंतर प्रॉपर्टी सेलने अभिजीत बोंबलेला अटक केली. मात्र त्याचं आणि राज कुंद्रा कनेक्शन अद्याप समोर आलेलं नाही.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये काही अॅडल्ट सिनेमे बनवण्यात आले होते. त्यापैकी काही अभिजीत बोंबलेने दिग्दर्शित केले होते. काही दिवसांपूर्वी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एका पीडितेने तक्रार केली होती ज्याचा तपास नंतर प्रॉपर्टी सेलकडे वर्ग करण्यात आला होता. त्याच प्रकरणात अभिजीत बोंबलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असून शुक्रवारपर्यंत कोर्टाने अभिजीत बोंबलेला पोलीस कोठडी सुनावली आहे.


मालवली पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये एकूण चार आरोपी होते. त्यापैकी एक गहना वशिष्ठ आणि अभिजीत बोंबले हे सुद्धा होते. तर त्यामध्ये दोन प्रोड्युसर होते, जे राज कुंद्राच्या हॉट शॉट ॲपसाठी काम करत होते.


काय होतं प्रकरण?


काही दिवसांपुर्वी एका पीडितेने मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये तिने म्हटलं होतं की काही लोक तिला भेटले जे राज कुंद्राच्या हॉट शॉट ॲपसाठी काम करत होते. बड्या बॅनरचे सिनेमे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिला अॅडल्ट फिल्ममध्ये काम करण्यास सांगितलं गेलं. यासाठी तिला एक लाख रुपये देण्याचं ठरलं. तेव्हा त्या पीडितेने नकार दिला. मात्र तेव्हा त्यांनी तिला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नसल्याचं सांगत धमकावलं आणि एक लाख रुपयांऐवजी फक्त साडेतीन हजार रुपये दिले गेले. तसेच काही अॅडल्ट सिनेमे सुद्धा शूट केले गेले होते, जे व्हायरल करण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे प्रॉपर्टी सेल आता या प्रकरणात येणाऱ्या दिवसांमध्ये अजून कोणाला अटक करते आणि कोण प्रॉपर्टी सेलचे चौकशीचे रडारवर आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण अभिजीत बोंबलेकडून काही महत्त्वाचे आणि मोठे खुलासे झाले आहेत, ज्याद्वारे आता प्रॉपर्टी सेलचा तपास सुरू आहे.