Pregnancy and Diabetes : मधुमेह विशेषतः महिलांसाठी धोकादायक ठरत आहे. मधुमेहाचा परिणाम आरोग्यावर होत असल्याने त्यांना हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, अंधत्व, नैराश्य, मूत्रमार्गाचे संक्रमण (यूटीआय), वंध्यत्व आणि गर्भपात होण्याचा धोका असू शकतो. मधुमेह असलेल्या गर्भवती महिलांनी औषधे घेणे टाळावे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे आणि संतुलित आहार घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. अनियंत्रित मधुमेहामुळे उद्भवणारी गर्भधारणेत अडचणीची ठरू शकते.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गुप्ते म्हणाले की, मधुमेह हा एक चयापचय विकार आहे. ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते. मधुमेह असलेल्या स्त्रियांमध्ये योनीतून स्त्राव, योनीमार्गाला खाज सुटणे, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) होण्याची शक्यता, सेक्स ड्राइव्ह कमी होणे तसेच इतर समस्यांव्यतिरिक्त वारंवार लघवी होणे यासारखी चिंताजनक लक्षणे दिसून येतात. गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तातील साखरेची पातळी म्हणजे गर्भधारणेदरम्यान होणारा मधुमेह, गर्भपात, मृत बाळाचा जन्म, गर्भातील जन्मजात दोष किंवा अकाली प्रसूती होऊ शकते.
पुण्यातील लोकमान्य रूग्णालयातील मधुमेह तज्ज्ञ डॉ. स्नेहल देसाई म्हणाल्या की, गर्भधारणेतील मधुमेह ही गर्भधारणेतील एक प्रमुख गुंतागुंत आहे. जगभरातील २०% गर्भवती महिलांमध्ये हे गुंतागुंतीचे मुख्य कारण ठरत आहे. भारतात, गर्भधारणा होण्यास उशीर होतो आणि टाइप 2 मधुमेह सुरू होण्याचे वय कमी असल्यामुळे हे अधिक सामान्य आहे. गर्भधारणा ही एक अशी स्थिती आहे. ज्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होतो आणि हायपर इन्सुलिनचा संचय होतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. इन्सुलिनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे मॅक्रोसोमिया (शरीरातील इतर अवयवांपेक्षा मोठे डोके), श्वास घेण्यात अडचण, कावीळ, हायपोग्लायसेमिया, म्हणजेच बाळामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी होते. गर्भधारणेदरम्यान मधुमेहामुळे गर्भाच्या काही विकृती विकसित होतात, सर्वात सामान्य सॅक्रल एजेनेसिस म्हणजे खालच्या मणक्याचा आणि नितंबांचा अयोग्य विकास. या विकृती गर्भधारणा ओळखण्यापूर्वीच विकसित होतात. त्यामुळे महिलांनी गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी रक्तातील साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे.
डॉ. गुप्ते पुढे म्हणाले की, गर्भधारणेदरम्यान एखाद्याच्या इन्सुलिन किंवा इतर औषधांमध्ये समायोजन आवश्यक असते, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. विशेषत: मधुमेह असलेल्या महिलांसाठी जन्मपूर्व काळजी घेणे आवश्यक असते. गर्भधारणेच्या गुंतागुंत टाळण्यासाठी, हृदय, मूत्रपिंड किंवा यकृताच्या कोणत्याही समस्यांसाठी तुमचे मूल्यांकन करण्यासाठी विविध रक्त आणि इतर चाचण्या करणं गरजेचं आहे.
तुम्हाला मधुमेह असल्यास, ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, शेंगा आणि मसूर खा. जंक फुड, तेलकट, प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील पदार्थ, मिठाई आणि कार्बोनेटेड पेयांचे सेवन टाळा. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा आणि योग्य वजन राखा, असेही डॉ. देसाई यांनी म्हटले आहे.