मुंबई : धुळ्यातील भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर दोन अटींवर राजीनामा मागे घेतल्याची कबुली गोटेंनी विधानभवन परिसरात दिली.


मुख्यमंत्र्यांनी साडेतीन तास चर्चा करुन मन वळवल्याचं आमदार अनिल गोटे यांनी सांगितलं. गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देणार नाही आणि धुळे महापालिकेच्या निवडणुका गोटेंच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील, या अटी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. दगाफटका झाला तर पुन्हा आक्रमक होणार असल्याचा इशाराही गोटेंनी दिला.

भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावर अनिल गोटेंनी शरसंधान साधलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणाऱ्या लोकांना पक्षात स्थान दिले जात असल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपण धुळ्याच्या महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याबाबत धुळ्यातील शिवतीर्थ चौकातील जाहीर सभेत स्वत: अनिल गोटे यांनी सांगितलं होतं.

धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या भाजपच्या पहिल्याच जाहीर सभेत धुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. बॅनरवरुन शहराचे आमदार अनिल गोटेंचाच फोटो गायब होता. याचाच जाब विचारण्यासाठी समर्थकांना घेऊन आमदार गोटे सभास्थळी पोहोचले.

फोटोवरुन नाराजी

खरंतर गोटेंना माझा फोटो का वगळला, याचा जाब भरसभेत विचारायचा होता. मात्र आधी दानवे आणि त्यानंतर गिरीश महाजनांनी त्यांना रोखलं. मात्र त्यामुळे कार्यकर्ते चवताळले आणि त्यांनी थेट खुर्च्यांचीच मोडतोड सुरु केली.

भाजपला घरचा आहेर

शिवतीर्थ चौकातील आमदार अनिल गोटे यांच्या सभास्थळी लावलेल्या बॅनरवर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तसंच रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल या तिघांच्या फोटोला स्थान नव्हते. या सभेत आमदार अनिल गोटे यांनी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाबाबत परखड मत मांडत भाजपला घरचा आहेर दिला.

कोण आहेत अनिल गोटे 

संपूर्ण नाव - अनिल उमराव गोटे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक-  1965 जनसंघ (भाजप) .

1971-1999 दैनिक लोकसत्ता (पत्रकार )

1974 मध्ये जनसंघ संघटन मंत्री असताना 14 नगरसेवक तत्कालीन धुळे नगरपालिकेत निवडून आणले

1979-1988 शेतकरी संघटना

1988-1993 देवीलालजी माजी उपपंतप्रधान यांच्यासोबत काम

1993 स्वतःचा समाजवादी जनता पार्टी महाराष्ट्र पक्ष स्थापन

1998 - समाजवादी जनता पार्टी महाराष्ट्र या पक्षाचे नाव बदलून लोकसंग्राम केलं

1999- 2004 स्वतः च्या लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले

2009 ते 2014 - आमदार (दुसरी टर्म ) (पक्ष -लोकसंग्राम )

2014 मध्ये भाजप पक्षात प्रवेश, 2014 ते आजपर्यंत भाजप आमदार (तिसरी टर्म)